लातूर – नीट गुणवाढीसंदर्भात अटकेतील आराेपींची चाैकशी केली असता, अडव्हाॅन्स ५० हजार, प्रवेशपत्र देणाऱ्या २८ पालक-विद्यार्थ्यांची यादीच स्थानिक तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यांचा शाेध घेऊन चाैकशी करण्यात आली.
यात लातूरसह इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे समाेर आले आहे. सीबीआय चाैकशीतून आता याची व्याप्ती स्पष्ट हाेणार आहे.
दिल्लीतील नाेएडा येथे नाेकरीला असलेल्या गंगाधारला सीबीआयने अटक केली. गंगाधार आणि लातुरातील पाेलिस काेठडीतील आराेपींचा मध्यस्थ इरण्णा काेनगलवार अद्याप पसार आहे. गंगाधारच्या चाैकशीत मराठवाड्यातील किती जिल्ह्यातील पालक-विद्यार्थी आराेपींच्या जाळ्यात अडकले, याचा उलगडा हाेणार आहे. देशभर ‘नीट’ गाेंधळाचा प्रकार समाेर आल्यानंतर लातूरचे नाव चर्चेत आले. नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीतील सूत्रधार गंगाधर याच्यासह तिघांविराेधात गुन्हा दाखल झाला. अटकेतील दाेघा आराेपींची स्थानिक तपास यंत्रणांनी आठ दिवस कसून चाैकशी केली. यात रविवारअखेर लातूर, बीड आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील २८ विद्यार्थी-पालकांची यादी समाेर आली.
सीबीआय करणार आता स्वतंत्र तपास
या प्रकरणाचा तपास अत्यंत गाेपनीय पद्धतीने सुरु असून, आता लातूर पोलिसांकडून ताे सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तपास सीबीआयकडे वर्ग हाेताच दिल्ली येथील चार ते पाच अधिकारी रविवारी लातुरात धडकले. त्यांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आराेेपीची मोडस त्यांनी जाणून घेतली. अतिशय गोपनीय पद्धतीने सीबीआयच्या पथकाने आपले तपासकाम सुरु केले आहे. मंगळवारी दाेघा आराेपीला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय स्वतंत्र तपास करणार आहे.
कनेक्शनचा धागा सीबीआय शाेधणार
आरोपी संजय जाधव, जलीलखाॅ पठाण हे इरण्णा काेनगलवार याच्याकडे पैसे देत हाेते. ताे दिल्लीतील गंगाधरला पैसे पाठवत होता. त्यामुळे दिल्ली, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, राजस्थानमधील कोण-काेण गंगाधरच्या संपर्कात आहेत? याचाही तपास सीबीआय करत आहे. यातून लातूर-दिल्ली कनेक्शनचा धागा शाेधला जाणार आहे.
Users Today : 28