लातूर : नीट गुणवाढ संदर्भात लातूर पाेलिसांच्या काेठडीत असलेल्या दाेघा आराेपींच्या काेठडीची मुदत मंगळवार, २ जुलै राेजी संपणार आहे. त्यांना मंगळवारी पुन्हा लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर सीबीआयकडून चाैकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गत आठवडाभरापासून लातूर पाेलिसांच्या काेडीत असलेला नीट प्रकरणातील आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण, शिक्षक संजय जाधव याची स्थानिक तपास पथकांनी कसून चाैकशी केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले असून, नांदेडच्या एटीएस पथकाने प्राथमिक चाैकशीत जप्त केलेल्या इराण्णा काेनगलवारच्या माेबाइलमध्ये अनेक एजंटांचे माेबाइल नंबर, इतर माहिती असल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणात दिल्लीतून सूत्र हलविणारा या प्रकरणाचा म्हाेरक्या गंगाधरला सीबीआयने अटक केली असून, त्याची सध्या कसून चाैकशी सुरू आहे. आता लातुरातील दाेघांना ताब्यात घेत चाैकशी केली जाणार आहे. यासाठी रविवारी दिल्लीतील सीबीआयचे पथक लातुरात धडकले. मंगळवारी या आराेपींना ताब्यात घेतले जाणार आहे, असेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.