अहमदनगर: शहरातील बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा परिसरात पत्र्याच्या शेडमधील तीन दुकानांना आग लागून आतील सर्व सामान खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (दि.८) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
घटनेनंतर महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या दोन वाहनांमधून पाणी मारण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली.
बालिकाश्रम रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये चप्पल, फब्रिकेशन व इलेक्ट्रिक स्कूटर दुरुस्त करण्याचे असे तीन दुकाने होते. यातील एका दुकानाला शार्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, काही वेळातच आगीने उग्र रुप धारण केल्याने मोठा भडका उडाला. दरम्यान मनपाच्या अग्नीशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर काही वेळातच दोन अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी आग विझविण्यापेक्षा बघ्यांचीच मोठी गर्दी झाल्याने अग्नीशमन विभागालाही आग आटोक्यात आणण्यात अडथळे निर्माण झाले होते. अग्नीशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली