पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पोलिसांत खोटी तक्रार देणाऱ्या पतीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीने इलेक्ट्रिक शॉक देऊन आणि गळा आवळून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. त्यानंतर पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘शीतल स्वप्नील रणपिसे (वय २३, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय २६) याला अटक करण्यात आली,’ अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहायक निरीक्षक राहुल गावडे, अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीन, तुषार पंदारे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
घटना नेमकी काय?
आरोपी स्वप्नील उच्चशिक्षित आहे. सात महिन्यांपूर्वी स्वप्नीलचा शीतलशी विवाह झाला होता. तीन जुलैला स्वप्नील, त्याचे वडील श्यामराव आणि आई शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते. स्वप्नीलच्या आईचे रांजणगाव सांडस येथे साडीचे दुकान आहे. काम आटोपून दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्याने शीतलच्या मोबाइलवर संपर्क साधला; मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने चुलतभावाला बोलावून घेतले. दोघे घराच्या पाठीमागील दरवाजाने आत गेले, तेव्हा शीतल घरात बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती; तसेच इलेक्ट्रिक शॉक दिल्याचे दिसले. दोघांनी शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी स्वप्नीलने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पतीवर संशय कशामुळे?
स्वप्नीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी शीतलचा खून केला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी स्वप्नीलची चौकशी सुरू केली. ‘उच्चशिक्षित असलेल्या स्वप्नीलने माहिती दिली; मात्र माहितीतील विसंगती आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून स्वप्नीलवरील संशय बळावला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली,’ अशी माहिती पंकज देशमुख यांनी दिली.