जळगाव: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे अमिष दाखवत चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या विद्यार्थिनीची २१ लाख सात हजार ४५६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीला साक्षी सिंग नाव सांगणाऱ्या तरुणीने टेलिग्रामवर एक लिंक पाठविली. तसेच या विद्यार्थिनीला एका व्हाटस् ॲप ग्रुपवर जॉईन केले व एका व्हाटस् क्रमांकावरून बँक खात्याची माहिती तिला पाठविली.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होईल, असे अमिष दाखवत १७ मे ते ७ जुलै या दरम्यान तिच्याकडून वेळोवेळी एकूण २१ लाख सात हजार ४५६ रुपये स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही मोबदला मिळत नसल्याने तसेच मुद्दल रक्कमही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध बीएनएस ३१८ (४), ३(५) यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक एम.एम. कासार करीत आहेत.
आरटीजीएस, एनईएफटीद्वारे स्वीकारली रक्कम
या फसवणुकीमध्ये सायबर ठगांनी बँक खात्याची माहिती देऊन या तरुणीकडून आरटीजीएस, एनईएफटीद्वारे रक्कम स्वीकारली.