पानसरे खून खटला: संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी रद्द केला. तावडे याला तातडीने ताब्यात घ्यावे असा आदेश न्यायाधीश तांबे यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिला आहे.

मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याचा सहभाग असल्याचे पुरावे विशेष तपास पथकाला (एसआयटी) मिळाले होते. तेव्हा संशयित तावडे हा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनप्रकरणी सीबीआयच्या अटकेत होता. एसआयटीने सप्टेंबर २०१६ मध्ये सीबीआयकडून तावडे याचा ताबा घेतला. पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून हल्लेखोरांना प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रे आणि वाहनांची उपलब्धता करून देणे, राहण्याची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान, तावडे याच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

त्यानुसार त्याला जानेवारी २०१८ मध्ये जामीन मंजूर झाला होता. यावर आक्षेप घेत विशेष सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरण जिल्हा न्यायालयात चालवून त्यावर निर्णय व्हावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकिलांनी डॉ. तावडे याचा जामीन रद्द करण्याची विनंती जिल्हा न्यायालयाकडे केली होती.

विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांचा युक्तीवाद आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकूण अखेर न्यायाधीश तांबे यांनी संशयित तावडे याचा जामीन रद्द केला. तसेच त्याला तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश एटीएसला दिला आहे. यावेळी बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

तावडे जामिनावर बाहेर

पानसरे खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तावडे याची डॉ. दाभोळकर खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. त्यामुळे बचाव पक्षाने त्याची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयात केली. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून तावडे याची सुटका झाली होती. मात्र, जामीन रद्द झाल्यामुळे त्याला आता पुन्हा कोठडीत जावे लागणार आहे.

0 6 6 1 7 1
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *