व्यसनाधीन मुलाने आजारी वडिलांना जाळले!

Khozmaster
2 Min Read

बाळापूर (जि.अकोला): दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली.

 

लोटणापूरमध्ये धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे (५५) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून भाड्याच्या खोलीत राहतात. काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते खाटेवर पडून होते. दरम्यान, १४ जुलै रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे (३०) हा घरात दारू पिऊन आला व त्याची आजारी वडिलांशी बोलचाल झाली.

वाद वाढत गेला व रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील अग्नीने आजारी वडिलांच्या खाटेला खालून आग लावून तो घरातून निघून गेला. खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली. वृद्धाला अर्धांगवायूमुळे शरीराची हालचाल करता आली नाही. या आगीत ते गंभीररित्या भाजल्या गेलेत. यावेळी घरात कुणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. त्यांना उपचारार्थ अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग होताच खुनाचा उलगडा झाला
वृद्धाच्या मृत्यूनंतर अकोला येथे कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग केला होता. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व तिन्ही मुलांची कसून चौकशी केली. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश याच्याविरुद्ध त्याचाच लहान भाऊ गौरव अजाबराव इंगळे (२४) याने फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे, अक्षय देशमुख करीत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *