राज्यातील बसस्थानकांसाठी एमआयडीसीने दिले ६०० कोटी – मंत्री उदय सामंत

Khozmaster
2 Min Read

त्नागिरी : राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपये दिले आहेत. त्यात लोकार्पण होणारे पाली (ता. रत्नागिरी) हे सर्वात पहिले बसस्थानक आहे, असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

राज्य सरकार राबवत असलेल्या असंख्य लोकोपयोगी योजनांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीकाही त्यांनी केली.

मुंबई गोवा महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर महामार्ग यावरील पाली हे एकमेव बसस्थानक आहे. भविष्यात अधिक महत्त्व येणार असल्याने हे स्थानक नव्याने बांधण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाले. यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रण प्रश्रेश बोरसे, कार्यकारी अभियंता मीनल सोनावणे, पंचायत समितीचे माजी सभापती महेश तथा बाबू म्हाप, गोकुळ दूधचे संचालक मुरलीधर जाधव, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, संतोष सावंतदेसाई यांच्यासह अनेक अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खाते आहे. बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून निधी देण्याची सूचना त्यांनी आपल्याला केली. राज्यात १९३ बसस्थानकांचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाली बसस्थानकासाठी ३ कोटी ९२ लाख रुपये खर्च आला असून, जिल्ह्यातील अन्य स्थानिकांना ८० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. सर्व स्थानकांची कामे सुरू असून, त्यात सर्वात प्रथम आपल्या गावातील बसस्थानकच पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यासाठी आपण ५० नियमित आणि ५० मिनी बस मंजूर केल्या आहेत. पण फक्त इमारती उभ्या करुन चालत नाहीत. त्याची देखभालही करावी लागते. स्थानकांवरील सर्व सुविधा नियमित आहेत की नाहीत, त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पाली राज्यात आदर्श गाव बनवणार

पाली स्थानकावर महिलांसाठी वातानुकूलीत हिरकणी कक्ष बनवण्यात आला आहे. पालीमध्येच आपण महिला बचत गटांसाठी वातानुकूलीत सभागृह तयार करत आहाेत. पालीतील तरुणांनी सवलतीचे व्यावसायिक कर्ज घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन करतानाच त्यांनी पाली हे राज्यात आदर्श गाव ठरेल, अशा पद्धतीने योजना राबवण्याचे आश्वासन दिले.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *