नवी दिल्ली – दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि मानसिक छळाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील अकोला इथं राहणाऱ्या अंजली गोपनारायण ही दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
२१ जुलैला तिनं आत्महत्या केली, तिच्या सुसाईड नोटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आला. परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या युवतीला मानसिक तणावातून जावं लागत होतं. कोचिंग क्लास, घरमालकाचा दबाव, हॉस्टेलकडून होणारं आर्थिक आणि मानसिक शोषण यावर तिने भाष्य केले.
अंजली अकोल्यातून राजधानी दिल्लीत गेली होती. पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी अंजलीने यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी म्हणून घरी येण्याचं स्वप्न पाहिले होते. २ वर्षापूर्वी ती दिल्लीत गेली होती. अधिकारी बनल्यानंतर सरकारी वाहनातून तिला घरी यायचं होतं. मात्र तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिले आणि २३ जुलैला रुग्णवाहिकेतून अंजलीचा मृतदेह तिच्या घरी पोहचला.
अंजलीनं तिच्या सुसाईड नोटमधून विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक त्रासावर भाष्य केले. त्यानंतर तिने शेवटी लिहिलं की, पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर करणं माझं स्वप्न होतं. सर्व मित्रांचे, कुटुंबाचे आभार ज्यांनी मला पाठिंबा दिला. सुसाईड नोटमध्ये तिने एक स्माईल इमोजीही बनवली. आत्महत्या कुठल्याही समस्येचं समाधान नाही हे मला माहिती असल्याचं ती बोलली. परंतु पीजी आणि हॉस्टेलचे दर कमी असायला हवेत कारण अनेक विद्यार्थी हा भार सहन करू शकत नाही अशी मागणी तिने केली.
दरम्यान, दिल्लीत अंजली एका १० बाय १० च्या खोलीत राहायची. ज्याचे भाडे १५ हजारावरून १८ हजार केले होते. त्यामुळे अंजली तणावात होती असं अंजलीसोबत राहणाऱ्या तिच्या श्वेता नावाच्या मैत्रिणीने सांगितले आहे. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र या घटनेमुळे देशातील भविष्य सांभाळणाऱ्या या युवकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती दबावातून शिक्षण घ्यावे लागते हे समोर येत आहे.