छतरपूर – एका युवकानं त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराची हत्या करण्यासाठी श्रावण महिन्यात ११ दिवसांचे व्रत ठेवलं. हे व्रत संपताच त्याने दुसऱ्याच दिवशी त्या युवकाची हत्या केली.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील ही घटना आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेह धसान नदीत फेकून दिला आणि तिथून फरार झाला. या प्रकरणी छतरपूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक केली आहे.
१ ऑगस्टला शिवम मिश्रा नावाच्या युवकाच्या कुटुंबानं सिविल लाईन पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी राहुल विश्वकर्मा नावाच्या युवकाला ताब्यात घेतले. या युवकाने चौकशीत जे काही सांगितले त्याने पोलीस अधिकारीही हैराण झाले.
मित्राने केला खुलासा
जेव्हा पोलिसांनी राहुलची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, दिव्यांशु पालियाच्या सांगण्यावरून CCTV लावण्याच्या बहाण्याने मी शिवम मिश्राला माझ्या दुकानावर बोलावले होते. त्याठिकाणी आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने शिवमला बेदम मारले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला मग त्याचे हातपाय बांधून गाडीतून नौगाव येथील धसान नदीत फेकून दिले.
पोलीस काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत पोलीस अगम कुमार जैन म्हणाले की, एका महिलेसोबत बोलण्यावरून दिव्यांशु पालिया आणि शिवम मिश्रा यांच्यात भांडण झालं होतं. हळूहळू हे भांडण इतकं वाढले की दिव्यांशुने पालियाने शिवम मिश्राला जीवे मारण्याची धमकी दिली. दिव्यांशुने सर्वात आधी श्रावण महिन्यात ११ दिवसांचे व्रत ठेवले, व्रत संपताच १ ऑगस्टला साथीदार राहुल विश्वकर्मा आणि अन्य दोघांसोबत मिळून शिवम मिश्राची हत्या करण्याचा प्लॅन बनवला.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या ४८ तासांत आरोपींना जेरबंद केले आहे. दिव्यांशु पालिया आणि राहुल विश्वकर्मा यांना अटक करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील इतर २ आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.