जीएसटीने तार छेडली, वाद्यांचा स्वर महाग; निर्मात्यांमधून नाराजी

Khozmaster
3 Min Read

मिरज (जि. सांगली) : धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार या तयार वाद्यांना जीएसटी नाही.

मात्र, वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांना १२ ते १८ टक्के जीएसटी लागू केल्याने ही वाद्ये महागली आहेत. त्यामुळे वाद्य निर्मात्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवात मागणी असल्याने मिरजेतील वाद्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मात्र, सण उत्सवासाठी लागणाऱ्या वाद्यांच्या कच्च्या मालावर १२ ते १८ टक्के जीएसटी असल्याने या वाद्यांचा स्वर महागला आहे. तंतूवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे.

तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी वारकरी, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिरजेत मिळतात. श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मागणी असल्याने दरवर्षी मिरजेत कोट्यवधींची उलाढाल होते. येथे ढोल, ताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये मिळतात.

मिरजेतील होलसेल बाजारात उपलब्ध असलेल्या या वाद्यांना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह कर्नाटक व गोव्यातूनही मागणी आहे. धनगरी ढोलासाठी कातड्याची पाने व लाकूड मिरज परिसरात तयार होतात. ढोलासाठी फायबरचे पान उत्तर प्रदेशातील मेरठ येथून येते.
पंढरपूर, आळंदी, पैठण यांसह अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व मंदिरात मिरजेतून वाद्ये जातात. मात्र, जीएसटी लागू केल्याने सर्वच वाद्यांचा स्वर महागला आहे.

विभाग, राज्यानुसार वाद्य संस्कृती

प्रत्येक विभाग, जिल्ह्यात खाद्य व भाषा संस्कृतीप्रमाणे वेगळी आहे. वाद्य संस्कृतीही वेगवेगळी आहे. कोकणात पखवाज ढोलकी टाळ, स्टील ढोलास मागणी आहे. गोव्यात पखवाज हार्मोनियम संबळ वादन केले जाते. महाराष्ट्रात संबळ जोडीने वाजविले जाते. गोव्यात एकच संबळ वादन होते. मराठवाड्यात स्टिल ढोल, ताशे वादन केले जाते. विदर्भ मराठवाड्यात मोठ्या आकारातील ढोल वाजविले जातात. कर्नाटकात मोठ्या आकाराच्या हलगीचा वापर होतो.

सध्याच्या वाद्यांच्या किमती

धनगरी ढोल लाकडी : ५ ते १२ हजार
स्टील ढोल : २ ते ४ हजार
ढोलकी : २ ते ३ हजार
हार्मोनियम : ८ ते २५ हजार
तबला डग्गा : ४ ते ६ हजार
संबळ : दीड हजार रुपये जोडी
टाळ : ३०० ते १२०० रुपये
ताशा स्टील : ८०० रुपये
तांबे पितळेचा ताशा : ५ ते १५ हजार
झांज : ५०० ते १५०० रुपये
आरती मशिन : ९ ते १३ हजार.

मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, वाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर जीएसटी आकारणी झाल्यामुळे वाद्ये दहा ते पंधरा टक्के महागली आहेत.

0 8 9 4 6 0
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *