नवी दिल्ली: देशात सध्या ‘मेड इन इंडिया’ तसेच ‘मेक इन इंडिया’वर मोठा भर दिला जात आहे. भारतीय उत्पादनांचा डंका विदेशात वाजताना दिसतो. असे असले तरी भारतीय ग्राहकांचे प्रेम ‘मेड इन इंडिया’पेक्षा विदेशी उत्पादनांवर अधिक असल्याचे दिसून आले आहे.
तब्बल ६७ टक्के भारतीयांनी विदेशी उत्पादने खरेदी केली असल्याची बाब ‘अवलाय’ या रिसर्च कंपनीने जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
भारतात तब्बल ६७ टक्के लोकांनी विदेशी सामान घेण्यास प्राधान्य दिले आहे तर हेच प्रमाण अमेरिकेत ३७ टक्के आणि इंग्लंडमध्ये केवळ २७ टक्के इतके आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
- पाहणीत किती जणांचा सहभाग?
या पाहणीसाठी भारत, अमेरिका, इंग्लंडसह इतरही देशांमधील तब्बल ८,२०० जणांची मते जाणून घेण्यात आली आहेत. भारतीय सहभागींनी खरेदी करताना दर्जावर भर दिल्याचे या अहवालातून दिसते. भारतातील वस्तूंचा दर्जा चांगला असला तरी कंपन्या मार्केटिंगमध्ये कमी पडतात, असे मत नागरिकांना मांडले आहे.
अहवालातून काय समोर आले?
- ९४% जणांना वाटते की मेड इन इंडिया उत्पादने जागतिक स्तरावर उत्तम प्रकारे स्पर्धा करतात.
- ७८% भारतीयांना असे वाटते की विदेशी उत्पादनांचा दर्जा देशातील वस्तूंपेक्षा उजवा असतो.
- ७०% जणांना वाटते की, उत्तम दर्जामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारात चांगली मागणी असते.
- ६१% भारतीय ग्राहक विदेशी उत्पादनांच्या खरेदीसाठी ऑनलाइन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
- ४५% भारतीयांना या विदेशी उत्पादनांवर द्याव्या लागणाऱ्या सीमाशुल्काची माहिती नसते.
- ४२% जणांना वाटते की, मेक इन इंडिया कार्यक्रमाला जागतिक स्तरावर आणखी बळ देण्याची गरज आहे.
- ४.८% जण विदेशी कंपन्यांच्या वस्तूंची खरेदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करतात.
- कोणत्या उत्पादनांचे आकर्षण अधिक?
भारतात खरेदी केल्या जाणाऱ्या विदेशी उत्पादनांमध्ये फॅशन प्रोडक्टचे प्रमाण सर्वाधिक आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा क्रमांक लागतो ज्यात मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट आदींना मोठी मागणी असल्याचे दिसते.
- ई-कॉमर्सला चालना
मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे देशातील ई-कॉमर्स उद्योगाला चालना मिळाली आहे. उद्योगाने वर्षातच ४० हजार कोटी डॉलर्सचे लक्ष्य पार केले. आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे उत्पादनांचे ग्राहक देशातच नव्हे, विदेशातही वाढले आहेत.