Friday, September 13, 2024

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

त्नागिरी : मुंबई-गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘कोकण एक्स्प्रेस’ हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गासाठीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी भूसंपादनाच्या माेजणीचे काम ग्रामस्थांनी राेखले.

ग्रामस्थांनी या माेजणीला विराेध केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.

‘काेकण एक्स्प्रेस’ हा एकूण २२ गावातून जाणार असून, यामुळे मुंबई ते गोवा प्रवास ६ तासात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण ३६३ किलाेमीटर लांबीचा असणार असून, सहा मार्गिकांचा आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत जाणार आहे.

या महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून, या मार्गावरील विविध गावांतून भूसंपादन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी माेजणीसाठी अधिकारी दाखल झाले आहेत. सर्व शासकीय यंत्रणा गावात दाखल होताच येथील ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केला. त्यामुळे या भागात वातावरण तणावपूर्ण बनले हाेते.

या प्रकाराबाबत शिंदेसेनेचे शाखाप्रमुख संदेश बनप यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील यांच्याशी संपर्क साधत भूसंपादन माेजणीची त्यांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार अमरावती दौऱ्यावर असणारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर टाकण्यात आला. मंत्री सामंत यांनी तत्काळ ही मोजणी थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली. अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबविताच ग्रामस्थांचा विराेध मावळला.

घरे जाऊ देणार नाही : सामंत

काळबादेवीवासीयांची घरे जाऊ देणार नाही, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहे. येत्या दोन दिवसांत मी रत्नागिरीत आल्यावर याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang