पुणे : मागील काही महिन्यापासून पुणेपोलिसांनीअमली पदार्थ विरोधात मोहीम उघडली आहे. ललित पाटील आणि त्यानंतर विश्रांतवाडी ड्रस प्रकरणात पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची अमली पदार्थ जप्त केलेत.
तर अनेक जणांना अटकही केली आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आपला मोर्चा ड्रग्स विकत घेणाऱ्यांकडे वळवला आहे. आतापर्यंत झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी दहा ते पंधरा जणांना अटक केली आहे. यात काही ड्रग्स पेडल (ड्रग्स विक्री करणारे) यांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून ड्रग्स विकत घेणाऱ्यांची नावे देखील समोर आली असून आता हेच पोलिसांच्या रडावर आहेत. ड्रग्स विकत घेणाऱ्या ११९ जणांची यादीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तयार केली आहे. यातील प्रत्येकाची पुणे पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यात आतापर्यंत झालेल्या ड्रग्स कारवाया मधून ड्रग्स विकत घेणाऱ्याची काही नावे समोर आली आहेत. त्यामुळे ड्रग्स विकत घेणाऱ्यांमध्ये आणि त्याचे सेवन करणाऱ्यांमध्येही कायद्याची भीती राहावी यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. याशिवाय अशा व्यक्तींच्या चौकशीतून ड्रग्स विक्री करणाऱ्यांची (पेडलर) आणखी कुठली नावे निष्पन्न होतात का याचा देखील तपास पोलीस करणार आहेत. ड्रग्स विकत घेणारे ११९ जणांची यादीच पोलिसांनी तयार केली आहे. यामध्ये काही तरुण आणि तरुणींचा देखील समावेश आहे. या सर्वांची गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा काळाबाजार उघडकीस आला. या घटनेनंतर पुण्यातील तरुणाई अंमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव समोर आले. मागील वर्षी एकट्या पुणे शहरात तब्बल १३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ललित पाटील आणि विश्रांतवाडी ड्रग्स प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी अमली पदार्थ उत्पादनाचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून ड्रग्स विक्री करणाऱ्यांबरोबरच ड्रग्स विकत घेणारेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.