पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कोल्हापुरातील साक्षीदार शंभरीत; मुक्ताबाई पाटील यांनी जागवल्या जुन्या आठवणी

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. ७८ वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण दिन अनुभवलेली पिढी आजही कोल्हापुरात आहे. अर्थात,१५ ऑगस्ट १९४७ चा हा दिवस प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या मुक्ताबाई आनंदराव पाटील यांनी आज शंभरी गाठली आहे.

विशेष म्हणजे त्यांची नजर आणि स्मृती अजूनही खणखणीत आहे. त्यांच्या तोंडून जुन्या आठवणी ऐकणे खरोखरच रोमांचकारी आहे.

मुक्ताबाई कोल्हापुरात बेलबागेत स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ आपल्या मुलाजवळ त्या राहतात. त्यांचे पती आनंदराव बळवंतराव पाटील लष्करात होते. मूळचे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावाचे पाटील यांचा १९२३ चा जन्म. वयाच्या २२ व्या वर्षी ते ९ मार्च १९४२ मध्ये ब्रिटिश लष्करात भरती झाले. यावेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. या युद्धात भरती होण्यासाठी ब्रिटिश गावोगावी प्रचार करत होते. ते काही काळ ब्रह्मदेशात होते.

७ वर्षे ९ महिने सेवा करून ते १० डिसेंबर १९४९ रोजी निवृत्त झाले आणि कोल्हापुरात परत आले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे दोन्ही भाऊही भारतीय सैन्यात दाखल झाले. आता एक पुतण्या नेव्हीत आणि एक पुतण्या आर्मीत आहे. १९७८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर मुक्ताबाई यांनी मुलांना सांभाळले. तस्ते गल्लीतील लकडे-पवार हे त्यांचे माहेर. अहिल्याबाई शाळेत त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.

मुक्ताबाई सांगतात, देश स्वतंत्र झाल्याचा आनंद, म्हणून त्या १५ ऑगस्टला त्यांचे पती घरात मिठाई घेऊन आले. तहसीलदार कार्यालयाजवळ ध्वजवंदन झाले. त्यादिवशी सर्वांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. अनेकांनी लहान मुलांना, तेव्हा मिठाई वाटली होती. त्या दिवसाच्या माझ्या आठवणी अगदी लख्ख आहेत. माझे पती त्या दिवसाचे महत्त्व चांगले जाणून होते. त्यांनी ते सर्वांना सांगितले. येतानाच ते मिठाई घेऊन आले होते. त्यांनी घरात येताच आपला देश स्वतंत्र झाला, असे ओरडून सांगितले. सर्वांना मिठाई दिली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मुले भारत माता की जय.. वंदे मातरम, अशा घोषणा देत फिरत होते. आज वय वर्षे १०० झाले तरी मात्र तो दिवस माझ्या स्मरणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांना प्रत्यक्ष भेटण्याची त्यांची इच्छा आहे.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *