राजापुरात डॉक्टरकडून युवतीचा विनयभंग, ग्रामस्थांकडून डॉक्टरला चोप

Khozmaster
2 Min Read

राजापूर : फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी राजापुरात घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी डाॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. रंगराव संभाजी पाटील (६९, रा. धोपेश्वर घाटी, राजापूर) असे डाॅक्टरचे नाव आहे.

या प्रकाराबाबत राजापूरचे पाेलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकाराबाबत त्या पीडित युवतीने राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या पीडित युवतीला सर्दी व ताप येत होता. यासाठी ती मंगळवारी या डॉक्टरकडे तपासणीसाठी आली होती. मात्र, तरीही तिला बरे न वाटल्याने व अशक्तपणा असल्याने ती पुन्हा बुधवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या लहान भावासह डॉक्टरकडे गेली हाेती. तापामुळे अशक्तपणा आल्याने तुला सलाईन लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तिला बेडवर झोपायला सांगितले. तिच्या भावाला सलाईनमधून देण्यासाठी लागणारे इंजेक्शन प्रिस्क्रिप्शनवर लिहून देत ते मेडिकलमधून आणण्यास सांगितले.

त्यानंतर या पीडित युवतीला सलाईन लावल्यावर या डॉक्टरने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सलाईन संपल्यावर ही युवती भावासह घरी गेली व तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. या प्रकारानंतर गावातील ग्रामस्थांनी डॉक्टरच्या दवाखान्यावर धडक देत त्याला चोप दिला. त्यानंतर या डाॅक्टरला राजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पीडित युवतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. रंगराव पाटील याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५ (१) १ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिला हेडकाॅस्टेबल हर्षदा चव्हाण अधिक तपास करत आहेत.

‘इन कॅमेरा’ जबाब, डाॅक्टरला नाेटीस

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पीडित युवतीचा महिला अधिकारी, महिला पोलिस व महिला सरपंच यांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संबंधित डाॅक्टरचे वय हे ६५ च्या वर असल्याने अटक न करता वेळोवेळी पोलिस तपास व न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सक्त सूचनेची नोटीस देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी सांगितले.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *