सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नीसमक्ष ५५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी (ता.
सांगोला) येथील फॉरेस्ट रोडवर घडली. मात्र ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
गजेंद्र विश्वनाथ शिंदे (५५ रा.खिलारवाडी ता. सांगोला) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत, मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर किसन इंगोले (रा. खिलारवाडी ता. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी सागर इंगोले हा पत्नीसह कारमधून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी आरोपीस अवघ्या १२ तासांच्या आत पंढरपूरजवळ ताब्यात घेतले.