कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय डीएनए आणि फॉरेन्सिक रिपोर्टवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.
केस मजबूत करण्यासाठी हे केलं जात आहे. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा रिपोर्टमुळे तपास यंत्रणेला संजय रॉय हा एकमेव आरोपी आहे की गुन्ह्यात इतर लोकांचाही सहभाग आहे हे शोधण्यात मदत होईल. त्यामुळे महिला डॉक्टरवर बलात्कार की सामूहिक बलात्कार झाल्याचं स्पष्ट होईल. या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे.
या गुन्ह्यात संजय रॉय हा एकटाच आरोपी असल्याबाबत सीबीआय अजूनही काम करत आहे, मात्र एम्सच्या तज्ज्ञांचे मत जाणून घेतल्यानंतरच इतरांचा सहभाग होता का? याबाबत माहिती मिळेल. ९ ऑगस्ट रोजी आरजी कर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या ज्युनिअर डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता.
कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी संजय रॉय याला १० ऑगस्ट रोजी अटक केली होती. ९ ऑगस्टला पहाटे ४ वाजता संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या डाव्या गालावर जखमा, हातावर ओरखडे, शरीरावर ओरखडे आणि इतर अनेक खुणा पाहिल्या आहेत.
१३ ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश देताना कोलकाता पोलिसांना सर्व पुरावे आणि कागदपत्रे तपास यंत्रणेकडे सोपवण्यास सांगितले होते. यानंतर १४ ऑगस्टपासून सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीबीआयने कोलकाता पोलिसांकडून सर्व फॉरेन्सिक पुरावे ताब्यात घेतले. यानंतर मुख्य आरोपी संजय रॉय, वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष, चार ज्युनिअर डॉक्टर आणि एका व्हॉलंटिअरची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली.
संजय रॉय जेलमध्ये आहे. कोलकाता पोलिसांनी सुरुवातीच्या तपासानंतर त्याच्याविरुद्ध ५३ हून अधिक पुरावे सीबीआयकडे सुपूर्द केले आहेत. या पुराव्यामध्ये टेक्निकल पुराव्यापासून ते गुन्ह्याच्या घटनास्थळापर्यंतचे पुरावे आणि संजयकडून जप्त केलेल्या गोष्टींचा समावेश आहे. घटनेनंतर पोलिसांना संजय रॉयचे सीसीटीव्ही फुटेज आधीच मिळाले होते, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलकडे जाताना दिसत होता. घटनास्थळावरून त्याचा तुटलेला ब्लू टूथ नेकबँडही सापडला, जो त्याच्या मोबाईलसोबत जोडलेला होता.