मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची तयारी सुरू झाली आहे. त्यातच सध्याची राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचं काँग्रेसच्या सर्व्हेतून पुढे आले आहे.
मात्र हा सर्व्हे भाजपासह काँग्रेसचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटानेही नाकारला आहे.
महाविकास आघाडीत सध्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला २८८ मतदारसंघातून १६३३ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आम्हाला चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा होती मात्र इतक्या संख्येने इच्छुक काँग्रेसकडे उमेदवारी मागतील हे अपेक्षित नव्हतं असं ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. मुंबई काँग्रेसकडे २५६ अर्ज आले आहेत. विदर्भातून ४८५, उत्तर महाराष्ट्रात १४१, मराठवाडा ३२५, कोकण १२३, पश्चिम महाराष्ट्रातून ३०३ इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.
मुंबईतल्या ३६ जागांबाबत २-३ दिवसांत निर्णय होईल. मागच्या आठवड्यात मविआ नेते बैठकीला बसले होते. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मुंबईतल्या ३६ जागांबाबत फॉर्म्युला ठरू शकतो. आम्ही राज्यातील २८८ जागांवर मागील महिन्यात सर्व्हे केला. सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. त्यात काँग्रेसला ८०-८५ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ५५-६०, शिवसेना ठाकरे गट ३०-३५, भाजपा ६०-६२ तर शिवसेना एकनाथ शिंदे ३०-३२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८-९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
%%%pollid=189%%%
जागावाटपावर वाद होणार?
येत्या विधानसभेत काँग्रेसला १३० जागांवर निवडणूक लढायची आहे. तर मित्र पक्ष राष्ट्रवादीला ७५, ठाकरे गटाला ७५ आणि इतर जागा छोट्या पक्षांना देण्याची मागणी होतेय. परंतु हे जागावाटप उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मान्य होणार का हा प्रश्न आहे.
काँग्रेसच्या सर्व्हेवर भाजपा-ठाकरे गट काय म्हणाले?
काँग्रेसच्या सर्व्हेतील आकडे उद्धव ठाकरे गटावर दबाव आणण्यासाठी समोर आलेत. उद्धव ठाकरे सातत्याने स्वत:ला मुख्यमंत्रिपदासाठी समोर आणत आहेत. जर ठाकरेंना ३०-३५ जागा मिळणार असतील तर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकत नाहीत असं भाजपा नेत्याने म्हटलं तर महाविकास आघाडीत अद्याप आम्ही किती जागा लढवणार हे ठरलेले नाही. आम्ही सन्मानजनक जागा घेऊ आणि मोठ्या फरकाने जिंकू अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काँग्रेसच्या सर्व्हेवर दिली.
महाविकास आघाडीमुळे काँग्रेस-शरद पवारांचा फायदा, उद्धव ठाकरेंना फटका
२०१९ च्या निकालात शिवसेना-भाजपा महायुतीला जनतेनं कौल दिला. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात मविआचे सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. मात्र अवघ्या अडीच वर्षात हे सरकार कोसळले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली. त्यामुळे शिवसेनेत २ गट झाले. २०१९ च्या निवडणुकीत १८ खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना २०२४ च्या निवडणुकीत ९ खासदारांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसनं एका खासदारावरून १३ खासदारांपर्यंत मजल मारली. शरद पवारांनीही ४ खासदारांवरून ८ खासदार निवडून आणले. त्यामुळे महाविकास आघाडीमुळे काँग्रेस-शरद पवारांचा फायदा झाला मात्र उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष गेला. खासदारांची संख्याही कमी झाली. मागील निवडणुकीत ५५ आमदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंचे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती आमदार निवडून येतात ते पाहणे गरजेचे आहे.