मुंबई : विद्याविहार पुलाचे रेल्वेमार्गावरील काम पूर्ण झाले असले तरी पोहोच मार्ग तयार करण्यात अडचणी येत आहेत. रुळांच्या दोन्ही बाजूची झाडी आणि बांधकामे हटवल्याशिवाय पोहोच मार्ग बांधणे शक्य नाही.
त्यामुळे काही वर्षांपासून रखडलेला हा पूल मार्गी लागण्यासाठी फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विद्याविहार पुलामुळे पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्ग ते पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर (आरसी) मार्ग जोडला जाणार आहे. या पुलाचा पहिला गर्डर २७ मे २०२३, तर दुसरा गर्डर ४ नोव्हेंबर २०२३ ला उभारण्यात आला. या पुलाची लांबी ६१२ मीटर आहे. रेल्वेमार्गावरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद, हे दोन्ही गर्डर असून, त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या गर्डरला रुळांच्या मधोमध आधार न ठेवता, विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली आहे. रेल्वेच्या संरचनात्मक आराखड्यांत बदल झाल्याने रेल्वे हद्दीतील पुलाच्या कामांनाही विलंब झाला होता. त्यामुळे पुढील प्रक्रियाही रखडली. यातील दुसरा टप्पा पोहोच रस्त्यांचा असून, त्यातही अडथळे आहेत. पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या मार्गात ८० बांधकामे, म्हाडाची इमारत आणि विविध प्रकारच्या १८५ झाडांचा अडथळा आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याची माहिती महापालिकेच्या पूल विभागातील सूत्रांनी दिली.
सल्लागार शुल्कात वाढ-
पुलाच्या पर्यवेक्षणाचे काम आणि गर्डरचे वजन ६०० मेट्रिक टनने वाढल्याने सल्लागार मे. राइट्स लिमिटेड कंपनीच्या सल्लागार शुल्कातही वाढ झाली आहे. ही शुल्कवाढ तब्बल दोन कोटी ५३ लाख रुपयांची आहे. त्यामुळे सल्लागाराचे मूळ दोन कोटी दहा लाख असलेले शुल्क आता चार कोटी ६३ लाखांवर पोहोचले आहे.
२०१६ पासून रखडपट्टी-
पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार केला होता. २०२२ मध्ये बांधून हा पूल तयार होणार होता. मात्र, रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन, डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलाच्या डिझाइनमध्ये बदल सुचवले. यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात तसेच पुलाच्या पूर्व-पश्चिम भागांतही बदल करावे लागले