अकोला: दहा वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीला धमक्या देत तीच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याची घटना २३ ऑगस्ट राेजी समाेर आली हाेती. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी २० वर्षीय आराेपी यश युवराज गवइ या नराधमाला अवघ्या पाच तासात बेड्या ठाेकून न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी मिळाली हाेती.
साेमवारी या आराेपीला न्यायालयात पुन्हा हजर केले असता, त्याला पुन्हा दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.
तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब काही कामानिमीत्त अकाेटफैल पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील वल्लभनगर येथील नातेवाईकांकडे आले होते. ते त्यांच्या अल्पवयीन मुलीला नातेवाईकांकडे ठेवून बाहेर गेले हाेते. यावेळी मुलीच्या वडीलांचा नातेवाईक असलेल्या यश युवराज गवई याने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार पिडीत चिमुकलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी २३ ऑगस्टच्या मध्यरात्री अकोटफैल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. याप्रकरणी पाेलिसांनी आराेपी यश गवइ याच्या विराेधात बीएनएस कलम ६४, ६४ (२), (एफ), (एम), ६५, (२), ३३३, ३५१(२) (३), तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (एल)(एम)(एन), ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला करुन त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.डी.क्षिरसागर यांच्या समक्ष हजर केले असता, २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली हाेती. साेमवारी या आराेपीला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.
वारंवार अत्याचार; काेठडीत वाढ
वडिलांचा नातेवाइक असलेला आराेपी हा तेल्हारा येथे गेल्यानंतर मुलीला धमकावून तीच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. भितीपाेटी या चिमुकलीने अनेक दिवस हा अत्याचार सहन केला. सुनावणीदरम्यान ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. या संवेदनशिल प्रकरणाचा तपास अकाेटफैलचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पाेलिस निरीक्षक गजानन राठाेड, सहाय्यक पाेलिस निरीक्षक चंद्रकला मेसरे करीत आहेत.