दर्शन-पवित्राने कट रचला, रक्ताचे डाग अन् 230 पुरावे; रेणुकास्वामी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

Khozmaster
2 Min Read

बंगळुरू: कर्नाटकातील प्रसिद्ध रेणुकास्वामी हत्या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याच्या कपड्यांवर आणि अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्या चपलावर रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांसह सुमारे 230 पुरावे नोंदवून आरोपपत्र सादर केले आहे. दर्शन आणि पवित्रा या घटनेतील मुख्य आरोपी आहेत.

न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी दर्शन आणि पवित्रासह 17 आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याच्या फॉरेन्सिक अहवालासह 200 हून अधिक परिस्थितीजन्य पुरावे नमूद केले आहेत. यात गुन्ह्याच्या ठिकाणाहून घेतलेल्या छायाचित्राचाही समावेश आहे, ज्यामध्ये रेणुकास्वामी दर्शनसमोर जीवाची भीक मागत होता. धक्कादायक बाब म्हणजे खुनाच्या दिवशी पवित्राने रेणुकास्वामीला बुटाने मारहाण केली होती.

रेणुकास्वामीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याला अमानुष मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर अत्याचार करण्यासाठी विजेचे शॉक देण्यात आले. शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. त्याचा एक कान गायब होता, तर अंडकोष फाटला होता. यातून हे सिद्ध होते की, रेणुकास्वामीला हत्येपूर्वी खुप टॉर्चर करण्यात आले होते.

काय आहे संपूर्ण घटना?
रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी दर्शन थुगुडेपा आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 33 वर्षीय ऑटो चालक रेणुकास्वामी 9 जून रोजी बंगळुरुमधील उड्डाणपुलाजवळ मृतावस्थेत आढळून आला होता. दर्शनचा चाहता असलेला रेणुकास्वामी पवित्राला त्रास देत असल्याने दर्शनच्या सांगण्यावरुन एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन हत्या केली होती.

बंगळुरुच्या पट्टांगेरे गावात ही हत्येची घटना घडली आहे. आरोपींनी रेणुकास्वामीचा मृतदेह एका नाल्याजवळ फेकून दिला. दुसऱ्या दिवशी कुत्र्यांनी हा मृतदेह रस्त्यावर आणला, तेव्हा घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली, त्याने चौकशीत 30 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने अभिनेता दर्शनचे नाव घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *