आता आश्वासन नको, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : सिद्धार्थ खरात

Khozmaster
2 Min Read

मेहकर (तालुका प्रतिनिधी)- मेहकर-लोणार मतदारसंघासह जिल्हात अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात खरीप पिकांची नासाडी होत आहे. काही भागात पिकांचा चिखल झाला आहे. सातत्याने शेतकरीराजा नैसर्गिक संकटांत हतबल होऊन कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असताना नुसते पंचनामे काय करता? आता आश्वासन नको; शेतकऱ्यांना आधी सरसकट मदत करा, शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्या, अशा शब्दात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सदस्य तथा माजी सनदी अधिकारी व मेहकर विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इच्छुक असलेले उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी राज्य सरकारला फटकारले. त्यांनी मेहकर तालुक्यातील पारखेड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली असता, अक्षरशः विजयसिंह राठोड व मैनाबाई राठोड या बंजारा कुटुंब असलेल्या शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला होता. त्यावेळी सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांना मायेने जवळधरत त्याच्यांशी संवाद साधून धीर सोडू नका, उद्धवसाहेबांचा शिवसैनिक तुमच्या सोबत आहे. लवकरच तुम्हाला आर्थिक मदत कशी होईल, यासाठी तहसीलदारांकडे मागणी करतोय असा दिलासा दिला.यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धार्थ खरात म्हणाले की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांना आश्वासनाची खैरात वाटतात, पण प्रत्यक्ष मदत करीत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन वाटते. आज राज्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टीच्या पावसाचे आभाळ फाटलेले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत. तर मेहकर-लोणार मतदारसंघात पावसाचा जबर तडाखा बसला आहे. काही भागात सोयाबीन, मूग, उडीद, मका, तुरीचा अक्षरशः पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यापेक्षा, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी सकारात्मकता दाखवावी, असे प्रतिपादन सिद्धार्थ खरात यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *