दिवंगत नेते आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Khozmaster
3 Min Read

ठाणे: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ‘आनंदाश्रमा’त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटा उडवल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. शिवसेनेचे पदाधिकारी ढोलताशांच्या तालावर नाचत, दिघे यांच्या तसबिरीसमोरच नोटा फिरवून त्या उधळत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणावरून सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठवण्यात आली.

पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या घटनेवर मोठा निर्णय घेत त्यांनी संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्या संबंधीचं पत्र आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने जारी करण्यात आलं आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा प्रकार केल्याचे स्पष्टीकरण या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे. ‘शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंद दिघे यांच्या ‘आनंदाश्रमा’त तुम्ही नोटा उधळल्या. हा प्रकार अतिशय संतापजनक असून दिघे यांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले आहे. आमचा आनंद हरपला असून त्यांच्याबद्दल असलेले प्रेम किती खोटे आहे हेच यातून सिद्ध होते,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिली.लाखो शिवसैनिकांचे पवित्र मंदिर असलेल्या आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात नोटा उधळून त्या पायदळी तुडवण्यात आल्या. हा प्रकार व्हायरल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी माफीचे नाटक सुरू केले आहे. मात्र, या किळसवाण्या कृत्यामुळे ठाणे शहराला काळीमा फासला गेला आहे. हिंमत असेल, तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा देऊन या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.आनंदाश्रमात जे पैसे उधळले गेले, ते लुटीचे होते. आनंद दिघे असते, तर हंटर काढून लुटीचा पैसे उधळणाऱ्यांना फोडून काढले असते,’ अशा शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

म्हस्के यांचा पलटवार

शिवसेना उबाठा पक्षाने केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले. ‘युतीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जातात, अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील, तर तो धर्मवीर आनंद दिघे यांचा अपमान आहे,’ असा हल्लाबोल म्हस्के यांनी केला. ‘खोपकर हत्याकांडानंतर संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखामुळे आनंद दिघे यांना ‘टाडा’ लागला होता, त्यांना तुरुंगात जाऊन हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. संजय राऊत कायम बाळासाहेबांना चुकीची माहिती देत होते. काही मंडळींनी दिघे यांना राजकारणातून संपवण्याची सुपारी घेतली होती. संजय राऊत यांनी आम्हाला दिघेसाहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये,’ असे खासदार म्हस्के यांनी म्हटले.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *