ठाणे शहरात ड्रोन उडवण्यावर बंदी: पोलीस आयुक्तालयाचा प्रतिबंधात्मक आदेश
ठाणे, 15 मे 2025: ठाणे शहरात आता ड्रोन व इतर मानवरहित हवाई उपकरणे (UAVs) उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात हे नवीन आदेश लागू करण्यात आले असून, 14 मे 2025 पासून ते 3 जून 2025 पर्यंत प्रभावी राहणार आहेत.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटक ड्रोनचा वापर कायदा-सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्यासाठी करू शकतात, अशा शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल आवश्यक ठरल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. हा आदेश तातडीच्या परिस्थितीचा विचार करून तात्काळ लागू करण्यात आला आहे.
हा प्रतिबंधात्मक आदेश उपायुक्त (मुख्यालय-1), विशेष शाखा, ठाणे शहर, डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी जारी केला आहे.
Users Today : 18