ठाकरे गटाच्या ताब्यातील बाळापूरसाठी महायुतीत रस्सीखेच, तिन्ही पक्षांचा मतदारसंघावर डोळा, इच्छुकांची वाढली चिंता

Khozmaster
2 Min Read

नीरज आवंडेकर, अकोला शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या बाळापूर मतदारसंघासाठी महायुतीत स्पर्धा वाढली आहे. शिवसेना, भाजप अणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकही कामाला लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेत कार्यकर्त्यांना तसे संकेतही दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील इच्छुकांची चिंता वाढली आहे.

बाळापूर मतदारसंघात काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१९मध्ये हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे गेला. शिवसेनेचे नितीन देशमुख मताधिक्याने विजयी झाले. निवडणुकीनंतर पक्षांमध्ये फूट पडली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन गट पडले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीचे घटक आहेत. विद्यमान आमदार नितीन देशमुख शिवसेना (उबाठा)त आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांकडून इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, विठ्ठल सरप, तुकाराम दुधे यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोला पश्चिम आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे संदीप शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून कामाला सुरुवात केली आहे. कृष्णा अंधारे यांच्याही हालचाली वाढल्या आहेत. दीड वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

भाजपचे पाचही मतदारसंघांवर लक्ष

अकोला जिल्ह्यात पाचपैकी चार आमदार भाजपचे आहेत. आगामी निवडणुकीत पाचही आमदार भाजपचे असावे, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत कैले होते. त्यामुळे बाळापूर मतदारसंघ कुणाकडे जातो याबाबत चर्चा वाढल्या आहेत. भाजपकडून माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, जयंत मसने, किशोर मांगटे पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

वंचित’मध्ये इच्छुक अधिक

बाळापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रेहमान खान, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन दांदळे, प्रा. संतोष हुझे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, राम गव्हाणकर हे इच्छुक आहेत. या वाढत्या इच्छुकांमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *