अकोला प्रतिनिधी ;-
अनेक वर्षांपासून रखडलेल्या अकोला विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळाली आहे. अकोल्यातील भाजपचे युवा खासदार अनूप धोत्रे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित मानले जात असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोलेकरांना दिलेला शब्द पाळल्याचे स्पष्ट होत आहे.
या मान्यतेनंतर अकोल्याचे विमानतळ लवकरच सुरू होण्याच्या अपेक्षा अधिक दृढ झाल्या आहेत.
विमानतळ सुरू करण्यासाठी भाजप खासदारांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर अकोला विमानतळ रखडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. हा मुद्दा हाताळत युवा खासदार अनुप धोत्रे यांनी राज्य सरकारमध्ये सातत्याने प्रयत्न केले. भूसंपादनाशिवाय विस्तारकाम शक्य नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याकरिता निधीची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस अकोल्यात आले असताना त्यांनी “अकोल्याचे विमान लवकरच टेकऑफ होईल” अशी हमी दिली होती. ती हमी आता प्रत्यक्षात उतरू लागली आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक – भूसंपादनाला मंजुरी
अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्त जमीन संपादन अत्यावश्यक होते. या संदर्भात शासनाच्या पातळीवरील प्रमुख बैठका घेण्यात आल्या.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विमानचालन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समितीच्या बैठकीत *२०९ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी* देण्यात आली.
या निधीमुळे भूसंपादनाचा पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.लवकरच विस्तारीकरणाला सुरुवात – केंद्राच्या मंजुरीची प्रक्रिया गतिमान
या निधीनंतर विस्तारीकरणाचे काम सुरू करण्याकरिता अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याचा निर्धार खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री *मुरलीधर मोहोळ* यांच्याशी संपर्क साधून सर्व पुढील मंजुर्या आणि सोपस्कार तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
स्थानिक स्तरावरही पाठपुरावा
अकोला पूर्वचे आमदार *रणधीर सावरकर* यांनीही राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत हा विषय जिवंत ठेवला होता.
या प्रशासकीय मान्यतेनंतर अकोल्याचे स्वप्नवत विमानतळ प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच अकोल्याचे विमान खऱ्या अर्थाने टेकऑफ होणार असल्याचे संकेत नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत.
Users Today : 18