पातूर तालुका प्रतिनिधी ;-
पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत सावरगाव गावात गेल्या दहा वर्षांपासून कमी विद्युत दाबाची समस्या कायम असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने फ्रिज, पंखे, मोटार यांसारखी उपकरणे वारंवार निकामी होत आहेत, तर रात्रीच्या वेळी तांडा वस्तीत तर दिवे लुकलुकत राहतात.
महावितरणचे दुर्लक्ष, नागरिक हैराण
ग्रामस्थांनी अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी केल्या असल्या तरी विभागाकडून केवळ “तांत्रिक बिघाड” असे उत्तर दिले जाते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
ग्रामस्थांच्या मते, “आम्ही गेल्या दहा वर्षांपासून तांडा वस्तीसाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्याची मागणी करत आहोत, मात्र ती मागणी आजही कागदावरच आहे. वाढत्या तापमानात आणि ढगाळ वातावरणात कमी दाबाच्या विजेमुळे पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आम्ही अक्षरशः हैराण झालो आहोत.”
एकाच रोहित्रावर ओव्हरलोडमुळे समस्या
सध्या सावरगाव गाव व तांडा वस्तीचा एकाच रोहित्रावरून विद्युत पुरवठा केला जात आहे. या रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक मीटरधारकांचे कनेक्शन जोडले गेल्याने ओव्हरलोड निर्माण झाला आहे.
त्यामुळे विजेचा दाब सतत कमी राहतो, परिणामी उपकरणांचे नुकसान आणि वारंवार खंडित होणारा पुरवठा ही समस्या वाढली आहे.
ग्रामस्थांची मागणी – “स्वतंत्र रोहित्र बसवा”
ग्रामस्थांनी स्पष्ट मागणी केली आहे की,
तांडा वस्तीसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्राची स्थापना करावी,
विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून नियोजनबद्ध तपासणी करण्यात यावी,
तसेच दीर्घकाळापासून दुर्लक्षित मागणी तातडीने पूर्ण करण्यात यावी.
“उडवा-उडवीच्या उत्तरांऐवजी प्रत्यक्ष उपाय हवेत” — ग्रामस्थ
स्थानिक नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांवर उडवा-उडवीच्या उत्तरांचा आरोप करत इशारा दिला आहे की, जर लवकरच तांडा वस्तीसाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले नाही, तर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.
सावरगावातील नागरिकांचा एकमुखी आवाज “दहा वर्षे थांबलो, आता कृती पाहिजे!
Users Today : 26