ठाणे : ठाण्यातील कोलशेत इथे एका सिक्युरिटी सुपरवायझरचं डोकं छाटून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा आता उलगडा झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने इमारतीमधील सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. प्रसाद कदम असं आरोपीचं नाव आहे. सिक्युरिटी सुपरवायझरने शिवीगाळ केल्याने त्याने हे कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्याशिवाय आरोपीचं मानसिक संतुलनही सुस्थितीत नसल्याचं तपासात समोर आलं आहे. या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सोमवारी पहाटे कोलशेतमधील एका इमारतीच्या गच्चीवर सफाई कर्मचारी गेले होते. त्यावेळी सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ देबनाथ यांचा मृतदेह आढळून आला. हत्या करुन त्यांचं शीर धडावेगळं करण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर ठिकठिकाणी शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
लिफ्टमधून जाताना दोघं गेलं, पण…
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्हीमध्ये इमारतीतील सुरक्षा रक्षक आणि आरोपी प्रसाद कदम हा मृत सोमनाथ यांच्यासोबत लिफ्ट मधून जात असल्याचं दिसले. लिफ्टमधून जाताना दोघं दिसले, मात्र लिफ्टमधून परत येताना आरोपी प्रसाद कदम हा एकटाच होता. त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलीस पथकाकडून अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
दोघांमध्ये यापूर्वी वाद झाला होता…
सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ देबनाथ याने आरोपी प्रसाद याला शिवीगाळ केली होती. तसंच त्यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाले होते. सोमनाथ याने शिवीगाळ केल्याने त्याचा राग डोक्यात ठेवून त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबूली प्रसादने दिली आहे. प्रसाद याचे मानसिक संतुलन सुस्थितीत नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून प्रसाद याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.