कोल्हापूर : राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी स्थापन केलेल्या ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीला बंडखोरांची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी व महायुतीची उमेदवारी न मिळणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी असणार आहे, त्यांच्यावरच या आघाडीची नजर असून गेले काही दिवस तसा ते संपर्कही साधत आहेत.
नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास व महायुतीमध्ये सध्या जागा वाटपासाठी बैठकांचा जोर लागला आहे. दोन्हीकडे तीन-तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत; पण नव्या समीकरणामुळे प्रत्येक मतदारसंघात दोन्हीकडून प्रत्येकी एकाच पक्षाला लढण्याची संधी मिळणार आहे. यातून अनेक इच्छुकांचा पत्ता ‘कट’ होणार आहे. यामुळे काहींनी आतापासून राजकीय सोयीसाठी पक्षाला रामराम करून नव्या पक्षात प्रवेश करीत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यात माजी खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू या तीन प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती ही नवी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीकडे राज्यात सध्या तरी प्रत्येक मतदार संघात प्रबळ उमेदवार नाहीत; पण बऱ्याच मतदार संघात त्यांना आयते प्रबळ उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आणि महायुतीची उमेदवारी न मिळालेले काही नेते या आघाडीत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत.बंडखोरी करून अपक्ष लढण्यापेक्षा एखादा पक्ष असावा म्हणून या आघाडीला काही नेते प्राधान्य देण्याची शक्यता आहे. यामुळे काही मतदारसंघांत या आघाडीला उमेदवारांची ‘लॉटरी’ लागणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. यामुळेच गेले महिनाभर ते नाराज इच्छुकांच्या संपर्कात आहेत. प्राथमिक चर्चाही सुरू झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अशा इच्छुकांबाबत आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
या नव्या परिवर्तन महाशक्तीमध्ये अजूनही अनेक पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत. २६ सप्टेंबरला महामेळावा झाल्यानंतर जागावाटप, उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल. आमच्याकडे प्रबळ उमेदवारांची रांग लागेल, यात शंका नाही.