मंत्रिपद नाही म्हणून राजीनामा देणार होते, साहेबांनी सिडकोचं चेअरमन केलं, गोगावलेंचे शिरसाटांना टोले

Khozmaster
2 Min Read

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्या सुरु असल्याचं चित्र आहे. कारण संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्ष केल्यामुळे आमदार भरतशेठ गोगावले नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रिपद मिळालं नाही, तर राजीनाम्याची धमकी दिल्याने साहेबांनी त्यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं असावं, अशा शब्दात गोगावलेंनी खदखद व्यक्त केली. शिरसाटांचं थेट नाव घेतलं नसलं, तरी सिडकोच्या चेअरमनपदाची धुरा नुकतीच त्यांच्याकडे गेल्यामुळे गोगावलेंचा अंगुलीनिर्देश स्पष्ट होतो. अंबरनाथ शहरात आयोजित संवाद मेळाव्यात भरतशेठ गोगावले बोलत होते.

भरतशेठ गोगावले काय म्हणाले?

“ज्यावेळी मंत्रिपदं मिळाली, तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे. साहेबांनी आम्हाला विचारलं, शेठ काय करायचं? एक जण बोलला, मी राजीनामा देतो, त्याला समजवला. म्हटलं की तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली की मी राजीनामा देतो. म्हणून साहेबांनी कदाचित त्याला सिडकोचं अध्यक्षपद दिलं असावं.” असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं.”त्यानंतर एक किस्सा तर एवढा मोठा आहे…” असं भरतशेठ म्हणताच मंचावरील एका पदाधिकाऱ्याने त्याने हाताने किस्सा सांगण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोगावले त्याला तोडत म्हणाले, की “सांगायला पाहिजे.. कळायला पाहिजे ना… ते बोलले की आता काय करु शेठ? मला मंत्रिपद नाही मिळालं, तर माझी बायको आत्महत्या करेल… मी म्हटलं मग आमच्या बायकांनी काय करावं?” अशी तुफान फटकेबाजी भरतशेठ गोगावले यांनी केली.

भरत गोगावलेंना एसटी महामंडळ अध्यक्षपद

शिवसेना आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. भरत गोगावले हे दीर्घ काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. ते उघडपणे आपली इच्छा बोलूनही दाखवत असत. ‘कोट’ शिवून तयार असल्याचं त्यांचं वाक्य चर्चेचा विषय ठरायचे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने गोगावलेंनी नाराजीही व्यक्त केली होती. आता मंत्रिपद नसले, तरी कॅबिनेटचा दर्जा असलेल्या महामंडळांच्या अध्यक्षपदी गोगावलेंची वर्णी लागली आहे.गोगावलेंच्या निवडीने एसटी महामंडळाला दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र अध्यक्ष मिळाला आहे. कारण २०१४ पासून परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते.

शिरसाट यांना सिडको चेअरमनपद

दरम्यान, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाराज आमदारांची महामंडळांवर नियुक्ती होताना दिसत आहे. . संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या नेत्यांची महामंडळावर बोळवण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता निकाली काढली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *