लेकीचं उशीने तोंड दाबलं, मग पंख्याला गळफास, डोंबिवलीत हायप्रोफाईल सोसायटीत मायलेकीचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

डोंबिवली : आईने दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन आत्महत्या केली. मुलीचा तोंडावर उशी दाबून खून केल्यानंतर आईने स्वतः गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरातील रुणवाल माय सिटी या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. पूजाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुलीची हत्या, आईची आत्महत्या

आईने दोन वर्षांच्या लेकीची आधी तोंडावर उशी दाबून हत्या केली. त्यनंतर तिने स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाडले आहेत. तर या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.पूजा राहुल सपकाळ (२९) असे मयत आईचे, तर समृद्धी सपकाळ असे या घटनेत मृत्यू पावलेल्या चिमुरडीचे नाव आहे

उशीने मुलीचं तोंड दाबलं, मग पंख्याला गळफास

पूजा सपकाळ ही रुणवाल सिटी या गृह संकुलात राहत होती. आज, सोमवारी घरात मुलगी समृद्धी हिच्यासोबत असताना सकाळच्या सुमारास तिने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. त्यानंतर घरातील पंख्याला गळफास घेत मुली शेजारीच आयुष्याची दोरी कापली.

पूजाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, पूजाने मुलीसोबत आत्महत्या का केली याचा उलगडा झालेला नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *