मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे लोकप्रशासन अभ्यास मंडळाची स्थापना

Khozmaster
4 Min Read
स्पर्धा परीक्षेसाठी लोकप्रशासन हा अत्यंत उपयुक्त विषय आहे
वाशिम प्रदिप पट्टेबहादुर
स्थानिक, मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी लोकप्रशासन अभ्यास मंडळाची 2024-25 करिता स्थापना करण्यात आली.
अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस कुबडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दत्तात्रय ढवारे राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालय वाशिम व तन्मयी पद्मने (एम .ए. लोकप्रशासन, गोल्ड मेडलिस्ट, सेट, नेट)हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास गायकवाड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये लोकप्रशासन अभ्यास मंडळाच्या स्थापनेचे उद्देश सांगून लोकप्रशासन विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे स्पष्ट केले. डॉ. गायकवाड यांनी लोकप्रशासन अभ्यास मंडळातील सदस्यांच्या नावाची घोषणा केली. अभ्यास मंडळामध्ये अध्यक्ष -गायत्री कांबळे (बी.ए भाग तीन), उपाध्यक्ष- विवेक उपाडे (बी.ए भाग एक), सचिव -रोहन मोरे (बी.ए भाग तीन), कोषाध्यक्ष-रोशन धन्नू मांजरे (बी.ए भाग एक), सहसचिव-भारत असोले (बी.ए भाग दोन), प्रसिद्धीप्रमुख- निलेश इंगळे (बी.ए भाग एक) तर सदस्य म्हणून स्वाती बदर (बी.ए भाग तीन), नवनाथ बेले (बी.ए भाग २) आणि करण बेले (बी.ए भाग २) यांची निवड झाली असल्याचे जाहीर केले व या सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ. दत्तात्रय ढवारे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पूर्वी लोकप्रशासन एक राज्यशास्त्राचा भाग म्हणून शिकविला जात होता परंतु 1887 पासून वुड्रो विल्सन यांच्या लिखाणामुळे लोकप्रशासनाला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले व आज जगातील अनेक विद्यापीठांमध्ये लोकप्रशासन स्वतंत्र विषय म्हणून शिकविला जातो. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये लोकप्रशासन विषयाचा स्वतंत्र अभ्यास केला जात असून अमरावती विद्यापीठामध्ये मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाने लोकप्रशासन विषयाची विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी प्राप्त करून दिल्यामुळे प्रशासनाच्या घडामोडी व ज्ञान या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे याचा आनंद होतो आहे असे गौरव उद्गार काढले. लोकप्रशासन हा विषय यूपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी ऐच्छिक विषय म्हणून लोकप्रशासन विषयाची निवड करतात हे येथे महत्त्वपूर्ण आहे. पुढे त्यांनी लोकप्रशासन विषयाच्या पुस्तकी अभ्यासाबरोबरच विविध प्रशासकीय ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करावे असे आवाहनही केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेल्या तन्मयी पद्मने यांनी प्रशासन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण दैनंदिन जीवनात जगत असताना प्रशासकीय तत्वांचा आणि संकल्पनेचा वापर करतो असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यांने लोकप्रशासन विषयाचा अभ्यास केलाच पाहिजे असेही नमूद केले
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .जी एस .कुबडे यांनी अशा प्रकारच्या अभ्यास मंडळाच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेतले जाते व त्यांच्यामध्ये अभ्यासाप्रती, विषयाप्रती गोडी निर्माण केली जाते. त्यामुळे अभ्यास मंडळाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही नमूद केले. लोकप्रशासन हा आमच्या महाविद्यालयातील अत्यंत महत्त्वाचा विषय व विभाग असून याचे पदवी स्तरावर शिक्षण तर दिले जातेच परंतु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत एकमेव पीएच.डी संशोधनाचे कार्य हे या विभागामार्फत आमच्या महाविद्यालयात होत असल्याचा आनंद आहे. त्यामुळे लोकप्रशासन विभाग हा अभिनंदनास पात्र आहे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कांबळे ने तर आभार प्रदर्शन हर्षा पट्टेबद्दूर या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *