मालेगाव वाशिम प्रतिनिधी ;-
मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सुरक्षित पोहोचविल्यानंतर अंगरक्षक, सहकारी व चालक हे तिघे जण कारने मेहकरकडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात घडला. अपघातानंतर गंभीर जखमींना तत्काळ वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या एका मिनी ट्रकने अचानक यू-टर्न घेतला, त्याचवेळी नागपूरहून मेहकरकडे येणाऱ्या मंत्र्यांच्या ताफ्यातील कारची त्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडकेमुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रात्री उशिरा अपघात झाल्याने याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना आज दुपारी देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच ते नागपूरहून मुंबईत पोहोचले होते. पुढे दिल्लीला जाण्याचा त्यांचा नियोजित दौरा होता, मात्र अपघाताची गंभीरता लक्षात घेता त्यांनी दिल्ली दौरा रद्द करून मुंबईहून थेट मेहकरकडे प्रस्थान केले.
सध्या तिन्ही जखमींची प्रकृती गंभीर असून वाशिम येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Users Today : 6