विधानसभेसाठी महायुतीचा आकडा ठरला; विदर्भात ४५ तर मराठवाड्यात ३०, अमित शहांनी फुंकले रणशिंग

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : ‘मित्रपक्षाच्या विजयाविना आपण सत्तेत येऊ शकत नाही. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ चिन्ह; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ते ‘कमळ’ आहे, असे समजून काम करावे. पक्षात ‘इनकमिंग’ची चिंता करू नये. नव्याने सोबत येणाऱ्यांना साथ द्यावी,’ असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. विदर्भात ४५ आणि मराठवाड्यात ३० जागांवर विजयाची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी मंगळवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील ६२ जागांबाबत शहा यांनी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘लोकसभा निवडणुकीतील निकालाने निराश होण्याची गरज नाही. विदर्भात ४५ जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवा,’ अशा सूचना त्यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांना केली. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा मेळावा झाला. राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघटन सहसचिव शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‘विजयादशमीपासून दिवाळीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्त्यांना सज्ज करा. ‘ए’, ‘बी’, ‘सी’ असे बूथचे वर्गीकरण करा. प्रत्येकी दहा टक्के मते वाढवा,’ अशी तंबीच त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. ‘आपण कधीही आरक्षणाचा विरोध केला नाही. उलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपुष्टात आणण्याबाबतचे विधान परदेशात जाऊन केले. खोट्या कथनाला प्रत्युत्तर द्या. त्यातून पक्षाची प्रतिमा अबाधित राहील,’ असेही शहा म्हणाले.

‘कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा’

‘लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात अनपेक्षित निकाल लागला. वेगवेगळ्या पद्धतीने अनेक फॅक्टर एकत्रित आले होते. मात्र, आता चित्र वेगळे आहे. ‘लाडकी बहीण’सह विविध कल्याणकारी योजनांमुळे सकारात्मकता निर्माण झाली आहे. कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा आणि आत्मविश्वासाने मैदान उतरा,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मेळाव्यात केले. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *