अंबरनाथ : बदलापुरातील दोन अल्पवयीन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी पालकांची वणवण सुरू आहे. बदलापूर शहरानंतर अंबरनाथ, कल्याण, ठाणे आणि जिल्ह्यातील इतर पालिकांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अक्षयच्या अंत्यविधीसाठी नकार दिला. त्यामुळे अक्षयच्या पालकांना गुरुवारी अंबरनाथ आणि कल्याण येथून माघारी यावे लागले. आता अक्षयच्या अंत्यविधीचा नवा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे.अक्षयचे शवविच्छेदन आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीस परवानगी देण्यात आली. अक्षयच्या अंत्यविधीबाबत पोलिसांकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात येत असली तरी तो कुठे होणार, याबाबत अनेक प्रश्न आहेत. तो बदलापूर येथील निवासी असल्याने तेथे अंत्यविधी होणार असल्याचे गृहित धरून बुधवारी त्याच्या घराजवळ अनेक नातेवाईक जमा झाले होते. मात्र, ही बातमी शहरात पसरताच काही नागरिकांनी बदलापुरात अक्षयच्या अंत्यविधीला विरोध केला. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी अंत्यविधी थांबवला.
मनसेचा विरोध
त्यानंतर ठाणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार कल्याण आणि उल्हासनगर पोलिस उपायुक्त परिमंडळातील कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये अक्षयच्या अंत्यविधीसाठी त्याच्या कुटुंबाने पाहणी सुरू केली. यासोबतच अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी ठाण्यात किंवा कळव्यात जागा शोधण्यात येत असताना मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळवा पोलिसांना पत्र देत त्याचा मृतदेह दफन करू देणार नसल्याचे म्हटले.
अंबरनाथमधूनही माघारी
कल्याणमध्ये विरोध झाल्याने आणि उल्हासनगर शहरात दफनभूमीच नसल्याने दोन्ही पालिकांकडून नकार मिळाला. गुरुवारी अक्षयच्या पालकांनी अंबरनाथ पालिकेत भेट देत अक्षयच्या अंत्यविधीसाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत पश्चिमेतील स्मशानभूमीला भेट दिली. मात्र, स्मशानभूमीत दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याचे तसेच इतर धर्माच्या दफनभूमीत त्या त्या समाजाची परवानगी घेणे तसेच शिवसेना, मनसेचा विरोध यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीने अंबरनाथ पालिकेने अक्षयच्या कुटुंबाला नकार दिला. त्यामुळे त्याचा पालकांना अंबरनाथ येथूनही निराश होऊन माघारी फिरावे लागले.या प्रकरणी कुठलेही आदेश पालिकेला मिळाले नाहीत. तसेच शहराबाहेर शव दफन करण्यास महापालिकेला परवानगी देता येत नाही. काही राजकीय पक्षांचा विरोध पाहता, महापालिकेने त्यांना अंत्यविधीसाठी परवानगी नाकारली आहे.
– डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका