मुंबई : शेअर बाजारात व्यापार किंवा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (CSDL) नवीन समान दर लागू करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये GST सारखी म्हणजे वेगवेगळ्या करांऐवजी एकसमान दर व्यवस्था असणार आहे. ही नवी प्रणाली १ ऑक्टोबरपासून लागू होईल आणि तब्बल १३ कोटी गुंतवणूकदारांना या नवीन प्रणालीचा फायदा होणार आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे या नवीन दर रचनेत काही सवलती देखील लागू होतील.याशिवाय दोन दिवसांपूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX ने देखील ऑप्शन्ससाठी व्यवहार शुल्काबाबत घोषणा केली होती. MCX ने व्यवहार शुल्क सुधारित आणि समान लागू केले होते तर भांडवली बाजार नियामक सेबीने सर्वांना १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत दिली होती.
शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होईल
डीमॅट खात्यातून शेअर्स विकले जातात तेव्हा CDSL सारख्या डिपॉझिटरीद्वारे व्यवहार शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत, एकसमान दर प्रणाली लागू केल्यामुळे सुधारित दराचा उद्देश व्यवहार खर्चाचे प्रमाणीकरण करण्याचा असून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही केंद्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी आहे जिथे शेअर्स आणि बॉण्ड्स सारख्या सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याची सुविधा दिली जाते.त्याचवेळी, नवीन टॅरिफ रचनेव्यतिरिक्त सीडीएसएलने काही सवलती कायम ठेवण्याचे जाहीर केले आहे. विशेषत: महिला डिमॅट खातेधारक, मग ते सिंगल असो किंवा प्राथमिक खाते, त्यांना प्रति डेबिट व्यवहार ०.२५ रुपये सवलत मिळत राहील. महिला डिमॅट खातेधारकांसाठी, एकल किंवा प्रथम धारक म्हणून, त्यांना प्रति डेबिट व्यवहारासाठी ०.२५ रुपये सवलत सुरूच राहील असे सीडीएसएलने जाहीर केले. अशाप्रमाणे, म्युच्युअल फंड आणि बाँड ISIN (इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर) शी संबंधित डेबिट व्यवहारांवर ०.२५ रुपयांची सूट देखील लागू होईल.