छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात राजकारणात टोळीयुद्ध सुरू असून परिस्थिती रसातळाला गेली आहे. कष्टकरी आणि सामान्यांच्या प्रश्नांवर महायुती आणि महाविकास आघाडीला स्वारस्य नाही. कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ मैदानात उतरली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ७५ वर्षांच्या लुटीचा इतिहास सामान्यांपर्यंत घेऊन जात भाजप आणि काँग्रेसचा कोथळा बाहेर काढणार आहोत, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष आणि संघटनांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ ही तिसरी आघाडी उभी केली आहे. या आघाडीचा पहिला मेळावा गुरुवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. या मेळाव्याला स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे, जय विदर्भ पार्टीचे अरुण केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.‘एक म्हणतो लाडकी बहीण आणि दुसरा म्हणतो लाडका भाऊ. पण आम्हीच सख्खे भाऊ आहोत. २००४ मध्ये स्वामीनाथन आयोग नेमून २००६ मध्ये अहवाल स्वीकारला. पण काँग्रेसने एकही शिफारस लागू केली नाही. नोकरदारांचा आठवा वेतन आयोग मंजूर होत असेल तर स्वामीनाथन आयोग का नाही ? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. ही मानसन्मानाची नाही तर व्यवस्थेच्या विरोधातील लढाई आहे,’ असे कडू म्हणाले. ‘गेल्या १२ वर्षांत ३५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रात १८ ते ३५ वयोगटातील ५१.२५ टक्के तरुण बेरोजगार आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे,’ असे चटप म्हणाले. ‘गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे घडते आहे ते कुणाच्या मनाला पटेल असे नाही. कुणीच गंभीर नसल्याने महाराष्ट्रात सिंचन १७ टक्क्यांच्या वर गेले नाही,’ असे धोंडगे म्हणाले. धनंजय जाधव आणि अप्पासाहेब कुढेकर यांनी प्रास्ताविक केले.
शिवसेना, राष्ट्रवादीचे खुर्द व बुद्रूक
महाराष्ट्राला नवे नेतृत्व देण्यासाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडी आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे आपण चालतो का ? प्रस्थापित राजकारणी सांगतात त्यानुसार चालायचे का ? तर वेगळा विचार करुन आणि सत्तेत जाऊन सामान्यांचे प्रश्न सोडवू शकतो, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. राजकीय पक्षांची स्थिती अत्यंत वाईट आहे. पूर्वी खुर्द आणि बुद्रूक अशी लहान-मोठी गावे असत. त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही खुर्द व बुद्रूक झाली आहेत, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.