मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा गोळीबारात जखमी झाले आहेत. परवाना असलेली बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटल्यानं गोविंदा जखमी झाले. त्यांच्या गुडघ्यात गोळी लागली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गोळीबाराची घटना पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा सध्या आयसीयूमध्ये आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाकडून अद्याप तरी या घटनेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी लवकरच सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं गोविंदा यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे.मंगळवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास गोविंदा घराबाहेर निघण्याच्या तयारीत होते. घरातून निघण्याआधी ते त्यांच्याकडे असलेली बंदूक साफ करत होते. त्यावेळी त्यांच्या हातून चुकून गोळी सुटली. ती गोळी गुडघ्याला लागली. त्यांना जखमी अवस्थेत क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेल्याची माहिती आहे.गोविंदा यांची प्रकृती ठिक आहे. डॉक्टरांनी गुडघ्याला लागलेली गोळी काढली आहे. गोविंदा यांचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पहाटेच्या सुमारास कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होते. परवाना असलेली बंदूक ठेवतेवेळी ती त्यांच्या हातातून खाली पडली आणि गोळी पायाला लागली. डॉक्टरांनी पायातून गोळी काढलेली आहे. गोविंदांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही. त्यांची प्रकृती ठीक आहे.