मुंबई – हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ या चित्रपटातील राजेश खन्ना यांची भूमिका अजरामर झाली. या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची जोडीही खूप लोकप्रिय झाली. राजेश खन्ना तेव्हा सुपरस्टार होते आणि अमिताभ बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाबाबत धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं की, याआधी या चित्रपटासाठी त्यांना कास्ट करण्याची चर्चा होती. पण हृषीकेश मुखर्जी यांनी राजेश खन्ना यांना पुन्हा कास्ट केलं त्यामुळे धर्मेंद्र नाराज झाले.
धर्मेंद्र यांना स्क्रिप्ट सांगितली
जेव्हा धर्मेंद्र कपिल शर्मा च्या शोमध्ये आले होते तेव्हा त्यांनी ‘आनंद’ चित्रपटामधून त्यांना कसं काढलं याबद्दल सांगितलं होतं. धर्मेंद्र म्हणाले की, ‘हृषीकेश दा यांनी मला फ्लाइटमध्ये आनंदची गोष्ट सांगितली होती. बंगलोरहून येताना त्यांनी मला सांगितलं की आम्ही या चित्रपटासाठी तुम्हाला कास्ट करणार आहोत आणि नंतर मला कळलं की त्यांनी या चित्रपटात राजेश खन्ना यांना कास्ट केलं आहे.’यामुळे धर्मेंद्र हृषिकेश मुखर्जी यांच्यावर चांगलेच संतापले. धर्मेंद्र यांनी हृषीकेश यांना मद्यधुंद अवस्थेत फोन करून बोलावले होते. धर्मेंद्र म्हणाले की, ‘हृषीकेश यांनी रात्रभर झोपावं असं मला वाटत नव्हतं. मी त्यांना म्हणालो की तुम्ही मला ही भूमिका देणार होता, तुम्ही मला कथा सांगितली होती, मग हा चित्रपट तुम्ही राजेश खन्ना यांना का दिला?’
या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं
‘आनंद’ या चित्रपटामुळे झालेल्या गैरसमजानंतरही धर्मेंद्र आणि हृषीकेश मुखर्जी यांनी ‘चुपके चुपके’ आणि ‘गुड्डी’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं. अमिताभ बच्चन, सुमिता सन्याल, रमेश देव आणि सीमा देव यांसारखे कलाकारही ‘आनंद’ या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि हळूहळू कल्ट क्लासिकचा टॅग मिळवला. आजही हा चित्रपट बॉलिवूडमधील टॉप चित्रपटांपैकी एक आहे.