माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधवांच्या गाडीला अपघात

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. पिकअप चालकाने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे आज (30 सप्टेंबर) बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नेमकं काय घडलं?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. या अनुषंगाने त्या मतदारसंघातील गावांना भेटीगाठी देण्यासाठी सोमवारी सकाळी घरातून निघाल्या. संजना जाधव या बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम,आदित्य गरजे या कार्यकर्त्यांसह धुळे सोलापूर महामार्गावरून चाळीसगाव तालुक्यामध्ये रांजणगाव येथून जात होत्या. यावेळी भरधाव एक पिकअप (एम. एच ४२ बी.एफ. ०६१३) चालकाने संजना जाधव यांच्या वाहनाच्या चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली. यामुळे दोन वाहनांमध्ये जोराची धडक झाली. यात संजना जाधव यांच्या वाहनाचे आणि पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवाने या भीषण अपघातात संजना जाधव बचावल्या आहेत.

26 सप्टेंबर रोजी कन्नड मतदार संघातून इच्छुक असलेले नितीन पाटील यांच्या वाहनाचा देखील अपघात झाला होता. नितीन पाटील यांच्या वाहनासमोर म्हैस आल्याने हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये म्हशीचा मृत्यू झाला होता तर नितीन पाटील यांच्या वाहनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता आठ दिवसाच्या अंतरानेच दोन इच्छुकांचा उमेदवारांच्या गाडीचा अपघात झाल्याने कन्नड कार्यकर्त्यांमध्ये इच्छुकांनो तुम्ही जरा जपून असं म्हणण्याची वेळ आली आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. लवकरच निवडणुकीच्या अधिकृत तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे इच्छूक उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *