छत्रपती संभाजीनगर: महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी कॅफेमध्ये जागा उपलब्ध करून देणाऱ्या आणि कॅफेच्या आत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या २७ कॅफेंवर मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई केली. यावेळी काही ठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. हे कॅफे अत्याचाराचे अड्डे बनले आहेत असंदेखील पोलिसांच्या निदर्शनास आलं. या कारवाईमुळे कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहे. महानगरपालिका आणि पोलिसांच्या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.शहरातील कॅफे चालक महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी कॅफेमध्ये जागा उपलब्ध करून देतात, अशी माहिती महापालिका आयुक्तांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार मनपा व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात शहरात असलेल्या अनधिकृत कॉफी शॉप्सवर कारवाई करण्यात आली. यावेळी अनेक कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले.रेल्वे स्टेशन परिसरातील एकूण ३, उत्सव मंगल कार्यालय १, जवळील अजब नगर येथील २, एस. बी. कॉलेजजवळ औरंगपुरा येथे १, उस्मान पुरा यश मंगल कार्यालय मागे १, संत एकनाथ रंग मंदिर समोर ३, वेदांत नगर १, वीट्स हॉटेल जवळ १, दशमेश नगर २, कोकण वाडी चौक ४, देवगिरी कॉलेज रोड वरील १ अशी २० कॉफी शॉप्स जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या करिता अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ५ पथकं तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये पोलीस आयुक्तालयांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचादेखील समावेश होता.