छत्रपती संभाजीनगर : ‘लोकसभा निवडणुकीत महायुतीला १७ जागा जिंकून देण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा मोठा वाटा आहे; तरीसुद्धा महाराष्ट्रात आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने ‘रिपाई’ला आठ ते दहा जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या कोट्यातून प्रत्येकी तीन जागा द्याव्यात. या मागणीकडे डोळेझाक करून चालणार नाही,’ असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणि ‘रिपाइं’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात बुद्ध लेणीला भेट दिली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ‘विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपाइं'”‘ ला आठ ते दहा जागा देण्याची मागणी आहे. फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर मध्य, देगलूर, केज, बदनापूर आणि कळंब या मतदारसंघात महायुतीने विचार करावा. महायुतीला ला १६० ते १७० जागा मिळतील. ‘रिपाई’ जिकडे सत्ता तिकडे असे आतापर्यंत गमक आहे,’ असे आठवले म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळात पक्षाला स्थान मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांच्या निराला बाजार परिसरातील कार्यालयाचे आठवले यांनी उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, प्रदेश उपाध्यक्ष दौलत खरात आदी उपस्थित होते.
बुद्ध लेणीला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमधील बारा धार्मिक स्थळे काढण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सकाळी बुद्ध लेणी परिसरातील विहाराला भेट दिली. संबंधित वास्तू मराठवाड्यातील जनतेचे श्रद्धास्थान आहे. या वास्तूला धक्का लागणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आठवले यांनी दिली. ही जागा वन विभागाची असून मुख्यमंत्री याबाबत आदेश देणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.