जालना । प्रतिनिधी – जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे कोंडीराम गंगाधर निकम यांनी काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीला कुणीतरी खोडसाळपणाने आग लावून सुमारे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान केल्याची घटना आज शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून, याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमनाथ जळगाव येथील कोंडीराम गंगाधर निकम यांनी श्री विठ्ठल संस्थान जळगांव यांचा गट क्रं. 118 मधील 12 हेक्टर शेत जमीनपैकी सात एक्कर शेती माझ्याकडे मागील सात वर्षापासुन सुमारे सहा हजार रुपयेप्रमाणे ठोक्याने घेतलेली आहे,
यावर्षी त्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती व दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत पुर्ण पाच एक्कर सोयाबीनची काढणी केली व गंजी लावुन ताडपत्रीने झाकून ठेवली होती. आज शनिवारी सकाळी 6 वाजता ते आणि त्यांच्या घरातील सदस्य शेतातमध्ये थोडी राहीलेली सोयाबीन काढणी करण्यासाठी गेले असता, झाकुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागलेली दिसली. सर्व सोयाबीन जळून राख झाल्याचे बघून त्यांना धक्काच बसला.
शेताशेजारी असणारे तुकाराम आप्पासाहेब निकम यांना व इतर गावातील लोकांना विचारपुस केली असता त्याबाबत कोनाला काहीएक माहीती नसल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने सोयाबीनच्या गंजीला आग लावून चाळीस ते पन्नास क्वींटल सोयाबीन सोयाबीनचे म्हणजेच अडीच ते तीन लाखाचे नुकसान केल्याची तक्रार कोंडीराम निकम यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध बालवी कलम 326 (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय राऊत हे करत आहेत