नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मेहकर शहरात ९८० कोटींची विकासकामे केली :- आमदार संजय रायमुलकर

Khozmaster
2 Min Read
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागांमध्ये बहुविध प्रकारची ९८० कोटी रुपयांची विकास कामे गतकाळात करण्यात आली  असून विकासाचा हा झंजावात पुढेही सुरुच ठेवण्यात येईल, असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.
मेहकर नगरपालिकेच्या वतीने आयोजित ६८ कोटी रुपयांच्या विविध ३२ कामांचे आज आभासी पद्धतीने भूमिपूजन आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते आज झाले.           यानिमित्ताने पालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेशतात्या वाळूकर, माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के, युवासेनेचे तालुकाध्यक्ष भूषण घोडे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख कविता दांदडे, शहरप्रमुख वैशाली सावजी, आक्काबाई गायकवाड , अभियंता अजय मापारी, नितीन राऊत, हनीफ गवळी, श्रीमती फंगाळ प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्याधिकारी रामराजे कापरे , विविध विभागांचे कर्मचारी अजय चैताणे , संजय गिरी ,सुधीर सारोळकर , उपमुख्य अधिकारी श्रीमती खिल्लारे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक भाषणात रामराजे कापरे म्हणाले की, शहराच्या पाणीपुरवठा योजनेत ३८ कोटी रुपयांची वाढीव तरतूद झाली असून त्यातून ९५०० पाणी मीटर बसवण्यात येत आहेत. ८४ किलोमीटरची जलवाहिनी हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये बसविण्यात येत आहे.  इतरही कामे करण्यात येत आहेत. आपल्या भाषणात आमदार संजय रामुलकर पुढे म्हणाले की १०८ कोटींचा रस्ते कामांचा प्रस्ताव येत्या दोन-तीन दिवसात मंजूर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री असून धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे .त्यांच्या व महायुती सरकारच्या सहकार्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विकास कामे खेचून आणू शकलो. आमचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. विविध जाती धर्माच्या उत्कर्षासाठी विविध महामंडळे स्थापण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला आहे तो सर्वांना लाभकारक ठरेल.
शहरातील बेघरांसाठी फ्लॅट सिस्टीमची घरे मोठ्या प्रमाणात बांधून देण्याची योजना कार्यान्वित करत आहोत , असे सांगून आमदार रायमुलकर म्हणाले की, यासाठी शासन अडीच लाख रुपये देणार असून आठ ते दहा लाखाचे कर्ज गरजूंना उपलब्ध होईल. त्याची हमी नगरपालिका घेणार आहे. बेघर कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे शहराध्यक्ष जयचंद  बाठीया यांनी केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *