खो-खो खेळातील नवदुर्गा क्रमांक ७ : प्रियांका येळे गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
‘मी तिचा अभ्यास घेईन पण तिला खो-खो खेळूद्या’ असे म्हणून भाऊ पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि प्रियांकाने खो-खो विश्वात यशाचा झेंडा रोवला. फलटण तालुक्यातील साखरवाडीतून खो-खो खेळायला सुरुवात करणारी प्रियांका रामचंद्र येळे आहे नवरात्र उत्सवातील सातवी नवदुर्गा. सध्या ती जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी जालना येथे खो-खो मार्गदर्शक असून क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूंच्या थेट भरतीमध्ये नुकतीच तिची निवड झाली आहे.
प्रियांकाचे वडील साखर कारखान्यात काम करायचे तर आई गृहिणी होत्या. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच प्रियांकाने तिच्यातील खेळाडूची चुणूक दाखवली. धावण्याच्या स्पर्धेत प्रत्येक वेळी ती पहिली यायची. हे पाहून भाऊ राहुल याला खूप आनंद व्हायचा व आपल्या बहिणीने खो-खो खेळात उतरले पाहिजे असे त्याला वाटले. कारण साखरवाडी हे गाव खो-खो रत्नांची खाणच. इथल्या मैदानाने अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले. पण एका बाजूला आई वडिलांना वाटायचे की मुलगी अभ्यासात खुप हुशार आहे खेळामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. पण भाऊ राहुल दादा म्हणाला मी तिचा अभ्यास घेईन पण तिला खेळू द्या. उपजतच अंगी वेग असणारी प्रियांका खो-खो खेळातील तरबेज खेळाडू बनली. तालुका, जिल्हा, पुढे विभाग व राज्य स्पर्धेत जसजशी ती चमकायला लागली तसे मग घरून पण खेळासाठी वातावरण सकारात्मक झाले. एका स्पर्धेला पोहचण्यासाठी उशीर झाल्यामुळे शाळेचा संघ स्पर्धेला निघून गेला होता हे पाहून प्रियांका खूप रडली, त्यानंतर सरांनी तिला त्या बदल्यात दोन मोठया स्पर्धा बघायला घेऊन गेले आणि तिथूनच प्रेरणा घेऊन खो-खो प्रवासाची सुरुवात झाली .
साखरवाडी विद्यालयाच्या मैदानावर ती रोज सरावाला जायची. तिथं सर्व मुली टी शर्ट शाॅर्ट वर सराव करायच्या. लग्न, घरगुती कार्यक्रम, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम कशात सहभागी नाही. खो-खो हाच ध्यास अन खो-खो हाच श्वास असा आमचा संघ होता. फक्त खेळ महत्वाचा आहे का ? जगावेगळं काहीतरी करत राहता असं लोकं बोलायची. प्रियांका सोबतच्या वर्गातील इतर मुली अभ्यास करायच्या आणि ती खेळायला जायची. हे पाहून आई वडीलांना शेजारचे लोक आणि पाहुणे म्हणायचे कशाला पाठवता खेळाला ? काय करणार ती खेळून? पण प्रियांकाच्या आईचे विचार प्रगल्भ होते. त्या म्हणाल्या ‘माझ्या मुलींना मी खूप स्वच्छंद जगायला शिकवणार, त्या आकाशात पाखरा सारखी भरारी घेण्यासाठी आहेत ना की जबरदस्ती त्यांना घरात ठेवण्यासाठी’. मामा आणि आई वडील कायम खंबीरपणे सोबत असायचे. माझ्या सोबत छोटी बहीण पुजा पण सराव करायला यायची. विशेष म्हणजे ती पण राष्ट्रीय खो-खो खेळाडू आहे.
प्रियांकाचे खो-खो खेळातील सरंक्षण अत्यंत उत्तम होते. प्रतिस्पर्धी संघाने तिला बाद करणे हीच सामन्यातील आव्हानात्मक गोष्ट असायची. सातवीत असताना पुणे महापौर चषक स्पर्धेत तिने वेस्ट बंगाल विरुद्ध तब्बल नऊ मिनिटे पळतीचा खेळ केला आणि तिला तत्कालीन खो-खो संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडून शाबासकीची थाप मिळाली व स्वतः बोलावून घेऊन खेळाचे कौतुक केलं. इयत्ता आठवीत असताना वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले. ‘वय १३ वर्षे होते आणि सुवर्णपदकाची कामगिरी केली होती वरिष्ठ महिला गटामध्ये’; हे किती कौतुकास्पद आहे !
खेळला एवढा वेळ देऊन देखील ती मुधोजी काॅलेज फलटण येथून विज्ञान शाखेतून पदवीधर आहे. दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते प्रशिक्षक संजय जिजाबा बोडरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रियांकाने आजपर्यंत ईला पुरस्कार, वीर जानकी पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार असे जवळपास सर्वच मनाचे पुरस्कार तिला मिळाले आहेत. एवढे बहुमान मिळवणारी प्रियांका महाराष्ट्रातील प्रथम महिला खेळाडू आहे. २३ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन १८ सुवर्णपदक, ४ रौप्यपदक, १ कांस्यपदक मिळाले. पाच वेळा महाराष्ट्र संघाचे तिने कर्णधारपद भूषविले आहे.
सध्या खो-खो खेळणाऱ्या मुलींना संदेश देताना प्रियांका सांगते खेळात पण करिअर करता येऊ शकते. येत्या काळात खो-खो चा वर्ल्ड कप देखील जाहीर झाला आहे. त्यामुळे खो-खो ला अजून चांगले दिवस येणार आहेत. खेळामुळे आपण एक चांगले जीवन जगू शकतो, आयुष्यातील येणारा प्रत्येक चढउतार सहज पेलवू शकतो हे फक्त खेळामुळे होऊ शकते. खेळ जगायला आणि लढायला शिकवतो ! सध्या सुद्धा प्रियांका खो-खो साठी योगदान देत असून प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिचे पती आशिष केसकर यांनी तिला खेळापासून कधीच दूर केलेले नाही.
सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा खो-खो खेळाच्या मदतीने प्रियांकाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. तिच्या मेहनत व जिद्दीचे तिला फळ मिळाले. पुढील काळात देखील तिच्या मार्गदर्शनाखाली तिच्यासारखेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत याच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तिला शुभेच्छा ! आम्हाला तुझा अभिमान आहे.
संकलन : डॉ. राजकुमार देशमुख
#जागर_नवरात्रीचा
#सन्मान_खो_खो_कन्येचा