वाशिम:-(फुलचंद भगत)
शासनाने ठरवून दिलेल्या नामनिर्देशना नुसार वर्ष २०२४-२५ चे कायाकल्पचे प्रोत्साहनपर पारितोषिक ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर ला घोषीत झाले आहे.उपरोक्त पारितोषिक मुख्यतः रुग्णालय व परिसरातील स्वच्छता, जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच रुग्णालयातील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या संपूर्ण सोयी सुविधा व त्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा यावर आधारित असतो.
आजपर्यंत वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांपैकी केवळ मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयाला हे पारितोषिक मिळाले आहे.विशेष बाब म्हणजे मागील वर्षी २०२३-२४ ला सुध्दा हे पारितोषिक याच रुग्णालयाला मिळाले होते.यामध्ये पारितोषिक म्हणून रोख रक्कम १ लाख रुपये तसेच सन्मानपत्र रुग्णालयाला मिळणार आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे आणि बाह्यरुग्ण संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ पराग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयातील समस्त अधिकारी व कर्मचारी यांनी कामात सातत्य लागल्यामुळे यामुळेच सलग दोन वर्षांपासून कायाकल्प चे पारितोषिक या रुग्णालयाला मिळाले आहे. यात सर्व स्वच्छता कर्मचा-यांचे विशेष कौतुक करण्यासारखे आहे कारण रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी एकदम चोखपणे पार पाडली आहे. यामध्ये प्रकाश संगत, विजय संगत,पिंगाने मावशी, गेंड मावशी, पांडुरंग,अक्षय, राहुल, किरण , रामदास,कुसूम मावशी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान आहे. आणि हे पारितोषिक तिसऱ्या वर्षी पण मिळेल याच भावनेने सर्व अधिकारी व कर्मचारी काम करतील आणि येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सुविधा मिळेल याची काळजी घेतील अशी ग्वाही रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ श्रीकांत जाधव यानी दिली आहे.