मेहकर(अविनाश लाड):- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून ६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहकर परिसरातील चोपडे ले आउट भागात ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्य पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने मेहकर परिसरात छापा टाकला असता एक इसम चोरी केलेल्या गांजाची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. गणेश किशोर दिक्षित २४ वर्ष असे आरोपीचे नाव आहे. आरोपी डोणगांव येथील रहिवासी असून, चारचाकी वाहनात ११ किलो गांजा वाहतूक करताना तो आढळून आला. त्यांच्याकडील चारचाकी वाहन, ११ किलो ६०० ग्राम गांजा असा एकूण ६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी गणेश दिक्षित याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चेचरे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, सचिन कानडे, पोलीस हेड कॉंस्टेबल शरदचंद्र गिरी, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, पोलीस नायक विजय वारुळे, गणेश पाटील, पोलीस हवालदार विक्रांत इंगळे, दिपक वायाळ, मंगेश सनगाळे, चालक हवालदार शिवानंद मुंढे, राहूल बोर्ड, राजू आडवे, तांत्रिक विश्लेषण विभागातील ऋषीकेश खंडेराव यांनी केली.