शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुलुखमैदानी तोफ उद्या मेहकरात धडाडणार!!
मेहकर :-(विशेष प्रतिनिधी) – मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या पाठीमागे अखेर शेतकरी चळवळ एकवटली असून,आज २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने शेतकरी नेते तथा शेतकरी क्रांतीकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर हे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत. तुपकरांची जाहीर सभाच यानिमित्ताने होणार असून, यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन घडण्याची शक्यता आहे. डॉ. चव्हाण यांच्या पाठीमागे रविकांत तुपकर व शेतकरी चळवळ एकवटल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांना जोरदार टक्कर दिली होती. विशेष म्हणजे, मेहकर-लोणार मतदारसंघात प्रतापरावांच्या बरोबरीचा लीड त्यांना मिळाला होता. या मतदारसंघात रविकांत तुपकर यांना मानणारा मोठा वर्ग असून, त्यांचे मतदान आता डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी एकवटणार असल्याने शिंदे गटाच्या उमेदवारासह ठाकरे गटाच्या उमेदवारावर पराभवाची छाया निर्माण झाली आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण आणि ऋषांक चव्हाण हे दाम्पत्य शेतकरी चळवळीत कार्यरत असून, शेतकर्यांच्या हितासाठी त्यांनी आक्रमक आंदोलने तर केलीच, पण रविकांत तुपकरांसोबत सावलीसारखे उभे राहिलेले आहे. शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत ऋषांक चव्हाण यांनीही मेहकर विधानसभा मतदारसंघात शेतकरी प्रश्नांवर वेगवेगळी आंदोलने केली आहेत. शेतकर्यांच्या चळवळीची संघटनात्मक बांधणीदेखील केली आहे. कालच बुलढाणा येथे झालेल्या कार्यकर्ता मिळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचे जाहीर करत, शेतकरी चळवळीत काम करणार्या प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे उद्या रविकांत तुपकर हे मेहकर येथे डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या अर्ज भरण्याच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, यावेळी होणार्या जाहीर सभेलादेखील ते संबोधित करणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी चळवळ पाठीशी असल्याने डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी ताकद आता दहापटीने वाढली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. ऋतुजा ताई ऋषांक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि जाहीर सभेसाठी शेतकरी नेते, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ शेतकरी नेते रविकांत तुपकर, शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड, गणेश गारोळे आणि त्यांच्या मेहकर,लोणार तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. तुपकरांनी डॉ. ऋतुजा चव्हाण या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असल्या तरी,आपला उमेदवार समजून त्यांच्या विजयासाठी काम करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिल्या आहेत.स्वतः रविकांत तुपकरांनी डॉ. चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतल्याचे दिसून येत आहे.