मेहकर :- ( शहर प्रतिनिधी )
भगवान विष्णुस्वरूप पारिजात वृक्षास आलेली सुगंधी फुले भक्तराज भीष्मांनी वेचली, विशालबुध्दी व्यासांनी ती गुंफली, भाष्यकारांनी शोभविली व हा वीर्यशौर्यधैर्य वर्धक हार भाविकांना कंठात घालण्यासाठी सादर केला. या कधीही न सुकणाऱ्या पुष्पांची प्रभा दिवसेंदिवस फाकतच जाते. मानवाची ओढ दुःखमुक्ती आणि आनंदप्राप्तीसाठी आहे. हे साध्य करण्यासाठीचे एक प्रभावी साधन विष्णुसहस्त्र नाम आहे. ही नाममाला जीवाला समत्वाची श्रीमंती देऊन आत्मऐश्वर्याने युक्त करून भगवंतस्वरूप करते आणि नारायणाला आपल्या जीवनाशी जोडून भवरोग सारते. ही केवळ नामे नसून दिव्य जीवनसुत्रे आहेत. वेदअक्षरांनी पाया भरून वर आणलेले हे साहित्यमंदीर उपनिषद गर्भगृहाने नटलेले आहे, वर गीतेचा घुमट साजत असून त्यावर आकाराने लहान पण ज्ञानतेजाने महान असा विष्णुसहस्त्रनामाचा कळस शोभत आहे. माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनादादि संतांची प्रमाणे देऊन भागवताचार्य विश्वास महाराजांच्या मुखारविंदातून प्रत्येक नामाविषयी हृदयपरिवर्तनक्षम असे कल्याणकारी मार्गदर्शन लाभून मेहकर येथील भाविक प्रसन्न व तृप्त झाले.
प्रवचनमालेच्या कालावधीत प्रत्येकाचे मन भक्तीरसाने ओसंडून वाहत होते. भक्तांना कसलीही असुविधा होऊ नये यास्तव मोहन ठोसर, सौ. लालिता ठोसर, हर्षल सोमण, सौ. सलोनी सोमण, पुरुषोत्तम शीलवंत हे समर्पण भावाने सेवारत होते. या विष्णुनाम प्रवचनाचे महत्व प्रतिपादित करून भाविकांना श्रवणाचे आवाहन करणारी ‘नामाच्या या महिम्यामधुनी ज्ञानाचे हे बोध घेऊनी । भक्त ऐकती दंग होऊनी, डोलती आनंदे मनोमना’ ही रचना संगीत विशारद सौ. सलोनी सोमण यांनी रचून संगीतबध्द करून सादर केली. कु. अंकिता किशोर कुळकर्णी या चिमुकलीने संक्षिप्त स्वरूपात संपूर्ण रामायणाचा सुंदर देखावा सादर करून सर्वांनी मने जिंकली.
जीवाला मोक्ष प्राप्तीस सहाय्यक अशा या ज्ञानयज्ञाची पूर्णाहुती म्हणजे महाप्रसाद! भारतीय अध्यात्मिकता आणि संस्कृतीच्या कालातित मूल्यांचे प्रतिक म्हणजे महाप्रसाद! भगवद्नामचिंतनाने पवित्र झालेल्या वातावरणात तयार झालेला प्रसाद म्हणजे प्रेम, विश्वास आणि समर्पण यांचे प्रतिक, भक्त आणि भगवंत यांच्या दृढ संबंधाचा दर्शकच ! प्रसादाचा वाटप म्हणजेच भगवंताच्या आशीर्वाद व कृपेचाच वाटप. भक्तीभावाने प्रसाद ग्रहण करून सर्व भाविक कृतार्थ झाले.